पुणे : ‘लावणी ही केवळ शृंगारापुरती मर्यादित नाही. तिची व्याप्ती मोठी आहे. अनेक लोककलावंतांनी ही परंपरा जोपासली, पुढे नेली. आता मात्र तिचे विकृतीकरण सुरू असलेले दिसते,’ अशी खंत राज्य साहित्य-संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी शनिवारी व्यक्त केले. लोककलांचे होत चाललेले विकृतीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

रंगत-संगत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. मोरे यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांना सन्मानीत करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. पुणे गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, मैथिली आडकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘लावण्य’या विषयावर लावण्यांचे कविसंमेलन झाले. त्यात जयंत भिडे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, प्रभा सोनवणे, वर्षा कुलकर्णी, मीना शिंदे, रूपाली अवचरे, विजय सातपुते, वासंती वैद्य, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, सुजाता पवार हे कलाकार सहभागी झाले होते.

‘लावणी हा प्रकार केवळ शृंगारिक नाही. त्याची व्याप्ती मोठी आहे. त्यात अनेक सामाजिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संदर्भ दिले जातात. लावणीची परंपरा ही समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. सुरुवातीला सैनिकांची करमणूक व्हावी, रोजच्या कष्टातून थोडा विरंगुळा म्हणून लावणी सादर केली जायची. पुढे ही परंपरा विकसित होत गेली. अनेक लोककलावंतांनी तिला जोपासले, आणखी समृद्ध केले. आता तिचे विकृतीकरण सुरू आहे. त्यामुळे ही परंपरा जोपासण्याची गरज निर्माण झाली आहे,’ असे डॉ. मोरे यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘कला हे संस्कृतीचे अंग असते. लोकनाट्य, वगनाट्य, लावणी अशा लोककलांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मोठे योगदान दिले आहे. ही संस्कृती आणि या कलांचे जतन करून, त्यातील अस्सलपणा रसिकांपर्यंत पोहचणे महत्वाचे आहे. आज या कलांचे विकृतीकरण केले जात आहे. लावणीसारख्या लोककलांना विचित्र स्वरूप प्राप्त झाले आहे. लोककलांचे असे विकृतीकरण थांबवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

‘घरातील अडचणींमुळे मी या कलेला व्यवसाय म्हणून स्वीकारले. पुढे याच कलेने मला ओळख दिली. देश विदेशात सादरीकरण करण्याची, जगभरातील प्रसिद्ध कलाकारांना भेटण्याची संधी दिली. याच कलेने मला मान-मरातब-पैसा मिळवून दिला,’ अशी भावना जयमाला काळे-इनामदार यांनी व्यक्त केली. वैजयंती आपटे यांनी सूत्रसंचालन केले.

‘लावणीचा दर्जा खालावला’

‘आम्ही लावणी करताना कधीही प्रेक्षकांच्या नजरेला नजर दिली नाही, ना कधी वेगळ्या अर्थाचे इशारे केले. आता काही ठराविक कलावंतामुळे लावणीचे विकृतीकरण होत आहे. तिथे संस्कृती राहिलेली दिसत नाही. लावणीचा दर्जा घसरला असून, समाजातील कलेचा मानही या प्रकारांमुळे कमी झाल्याचे जाणवते,’ अशी खंत जयमाला काळे-इनामदार यांनी व्यक्त केली. लोककलांचे सादरीकरण करताना त्यातील घरंदाजपणा, शालीनता जपने गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.