संजय जाधव, लोकसत्ता
पुणे : लठ्ठपणा हा इतर व्याधींना निमंत्रण देणारा ठरतो. त्यामुळे मागील काही वर्षात लठ्ठपणा कमी करण्याच्या ‘बॅरिॲट्रिक’ शस्त्रक्रिया करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यासाठी खासगी रुग्णालयात दोन ते तीन लाख रुपयांहून अधिक खर्च येत असल्याने श्रीमंतांचाच ही शस्त्रक्रिया करण्याकडे कल होता. परंतु, ससून सर्वोपचार रुग्णालयात ती मोफत होऊ लागल्याने गरीब रुग्णही आता ही शस्त्रक्रिया करून घेऊ लागले आहेत.
आहार आणि जीवनशैलीतील बदलांमुळे लठ्ठपणा वाढत आहे. भारताचा विचार करता लठ्ठपणासोबत सहव्याधी असलेल्यांची संख्या पाच टक्के आहे. लठ्ठपणासोबत त्या व्यक्तीला इतर अनेक जीवघेण्या व्याधीही जडतात. त्यात हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, हाडांची झीज यांचा समावेश आहे. अनेक वेळा हाडांची झीज जास्त झाल्यामुळे सांधे बदलण्याची शस्त्रक्रियाही अशा रुग्णांना करावी लागते. यातून सुटका होण्यासाठी रुग्ण ‘बॅरिॲट्रिक’ शस्त्रक्रियेचा मार्ग अवलंबतात. खासगी रुग्णालयात यासाठी दोन ते तीन लाखांपासून पुढे खर्च येतो.
आणखी वाचा-पुणे: देशातील पहिल्या ओमिक्रॉन बूस्टर लशीची पुण्यात निर्मिती
श्रीमंत रुग्णांना ‘बॅरिॲट्रिक’ शस्त्रक्रिया खासगी रुग्णालयात करणे परवडते. मात्र, गरीब रुग्णांसाठी हा खर्च मोठा असतो. ही बाब लक्षात घेऊन सरकारी मोहिमेंतर्गत ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर गरीब रुग्णांसाठी बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया २०१२ मध्ये मोफत करण्यास सुरुवात केली. या शस्त्रक्रिया ते २०१९ पर्यंत करीत होते. त्यांची २०१९ मध्ये सोलापूरला बदली झाली. सोलापूरमध्येही त्यांनी ३२ शस्त्रक्रिया केल्या. ते यंदा जानेवारी महिन्यात पुण्यात बदलून आले. तेव्हापासून ससूनमध्ये बॅरिॲट्रिक शस्त्रक्रिया पुन्हा सुरू झाल्या आहेत. आतापर्यंत दहा शस्त्रक्रिया डॉ. ठाकूर यांनी केल्या आहेत.
‘बॅरिॲट्रिक’ शस्त्रक्रिया म्हणजे काय?
लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी त्या व्यक्तीची भूक कमी करणे आवश्यक असते. यासाठी जठराचा आकार कमी केला जातो. यामुळे आहार कमी होऊन भूकही कमी लागते. याचबरोबर काही शस्त्रक्रियांमध्ये जठराचा आकार कमी करून लहान आतड्याचा मार्ग बदलला जातो. यामुळे त्या व्यक्तीचा आहार कमी होतो आणि त्याबरोबर शरीरात उष्मांक शोषले जाण्याचे प्रमाण कमी होते. यातून लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते.
‘बॅरिॲट्रिक’ सर्जरी करणाऱ्यांमध्ये सर्वच जण सहव्याधी असलेले होते. त्यांना ही शस्त्रक्रिया करून तीन ते चार दिवसांत घरी सोडण्यात आले. पुढे त्यांना कोणत्याही आजाराची गोळी घ्यावी लागत नाही. -डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, ससून सर्वोपचार रुग्णालय