scorecardresearch

रावेतऐवजी शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी घ्या, खासदार श्रीरंग बारणे यांची सूचना

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित कामे आणि विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली

shrirang barane
(फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातील पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे महापालिकेने तेथून पाणी उचलणे बंद करावे. शिवणे येथील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी प्रयत्न करावेत. पाइपलाइन टाकण्यासाठी जागेचे भूसंपादन करावे, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिका प्रशासनाला केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील प्रलंबित कामे आणि विविध विकास कामांबाबत खासदार बारणे यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, उपायुक्त विठ्ठल जोशी, शहर अभियंता मकरंद निकम, पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे आदी बैठकीला उपस्थित होते.

आणखी वाचा- VIDEO: चौकशीच्या निमित्ताने चोर जवळ आला, गळ्यातील दागिणे ओढले, अन् १० वर्षाच्या मुलीने…”

शहरातील पाण्याच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. पवना नदीवरील रावेत बंधाऱ्यातील पाणी अतिशय खराब आहे. तेथून उचललेले पाणी शुद्ध केले जाते. पण, या पाण्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देहूरोड कॅन्टोन्मेंट (छावणी) बोर्ड हद्दीतील अनेक नाले थेट नदीपात्रात मिसळतात. ड्रेनेज, स्टॉम वॉटर लाईनच्या नाल्यासाठी स्वतंत्र लाईन काढावी. मैलामिश्रित पाणी नदीपात्रात जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी. रावेत बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम रखडले आहे. त्याच्या कामाला गती द्यावी. रावेत बंधाऱ्याऐवजी शिवणेतील बंधाऱ्यातून पाणी उचलण्यासाठी नियोजन करावे. त्यासाठी पाईपलाईन टाकण्याकरिता जागेचे भूसंपादन करावे.

चापेकर वाड्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. या कामाला गती द्यावी. त्यासाठी अधिकचा निधी लागल्यास राज्य शासनाकडून दिला जाईल. महापालिकेतील शिपाई संवर्गातील कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनश्रेणी मिळावी, घंटागाडी कामगारांचे प्रश्न सोडवावेत, निगडीतील महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची कामे तत्काळ मार्गी लावावीत, पवना नदी सुधार प्रकल्पाचा विकास आराखडा लवकर पूर्ण करावा, त्याच्या कामाला गती द्यावी, शहरातील कमी खाटा असलेल्या खासगी रुग्णालयांना जैव वैद्यकीय कचरा, परवानग्याबाबत अनेक अडचणी आहेत. त्यासाठी रुग्णालय संघटनेचे तीन प्रतिनिधी आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त समिती गठित केली जाणार आहे. ही समिती रुग्णालयाच्या अडचणी दूर करेल, असेही खासदार बारणे यांनी सांगितले.

आणखी वाचा- शिवज्योत घेऊन जाणाऱ्या टेम्पोला मुंबई-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात; २० ते २५ जण जखमी

संरक्षण मंत्र्यांसोबत बैठक

देहूरोड आयुध निर्माण कारखान्याचा (अम्युनिशन फॅक्टरी) संरक्षक भिंतीपासून दोनशे मीटर यार्ड हद्दीत किती कामे चालू आहेत, किती लोक बाधित होतील, याचा सर्व्हे करावा. बांधकाम परवानगी विषयक विकास करणे थांबविता येणार नसल्याचे महापालिका प्रशासनाने संरक्षण विभागाला लेखी पत्राद्वारे स्पष्ट केले आहे. परंतु, त्याची अंमलबजावणी होते की नाही हे तपासावे. या भागातील लोकांना त्रास देऊ नये, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दिल्लीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासोबत लवकरच बैठक होणार असल्याचेही खासदार बारणे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-03-2023 at 10:02 IST
ताज्या बातम्या