जेजुरी : मंदिर संस्कृतीची उत्कृष्ट निर्मिती, जीर्णोद्धार करणारे आणि इतिहासात आपल्या महापराक्रमाचा ठसा उमटवणारे खंडोबाभक्त सरदार मल्हारराव होळकर यांच्या जेजुरी येथील ‘मल्हार गौतमेश्वर छत्री स्मृती मंदिरा’ला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळावा, अशी मागणी इंदूरच्या क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी केली.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या पुण्यस्मरण शताब्दी सोहळ्यानिमित्ताने इंंदूर येथील क्षत्रिय धनगर सेवा संघाच्या कार्यकर्त्यांनी मल्हार गौतमेश्वर छत्री मंदिरास नुकतीच भेट दिली. प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले होळकरांचे छत्री मंदिर आणि त्या समोरील नंदी हा मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे. भंडारा उधळत या ऐतिहासिक वास्तूला राष्ट्रीय संरक्षित स्मारकाचा दर्जा शासनाने द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संघाचे संजय कड, दीपक वालेकर, पांडुरंग होळकर, अशोक काळे, मयंक भुसारी, मधुकर गोरे, सुबोध तांबे, विकास पारधी, शरद पारखे, बारामतीचे विक्रांत काळे, पुण्याचे विठ्ठल कडू आदी उपस्थित होते. यावेळी ही मागणी करण्यात आली. श्री मार्तंड देवसंस्थानचे विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी या मागणीला पाठिंबा दिला.

ऐतिहासिक जेजुरी गडाची वास्तुरचना व जीर्णोद्धार करणारे श्रीमंत सरदार मल्हारराव आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास गौरवास्पद आहे. जेजुरीचा खंडोबा हे होळकर घराण्याचे दैवत असल्याने गडाच्या पायथ्याशी मल्हार गौतमेश्वर छत्री स्मृती मंंदिर बांधण्यात आलेले आहे. येथील भव्य दगडी नंदी इतिहासाची साक्ष देतो. छत्री मंदिरामध्ये मल्हारराव होळकर आणि त्यांच्या भार्या यांच्या सुबक मूर्ती आणि देखणे शिवलिंग आहे. सध्या पुरातत्त्व विभागाच्या वतीने मंदिराची डागडुजी व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे.

इंदोरच्या क्षत्रिय धनगर संघाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत जिजामाता हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य नंदकुमार सागर यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या ३०० व्या पुण्यस्मरण शताब्दी सोहळ्यानिमित्त ६ आणि ७ मे रोजी इंदोर ते राज्यातील चौंडीपर्यंत अहिल्याविचार यात्रा, परिक्रमा होणार असल्याचे दीपक वालेकर यांनी सांगितले.