वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कमी झाल्याने विविध वस्तू स्वस्त झाल्या असल्या, तरी छपाईच्या कागदावरील ‘जीएसटी’मध्ये वाढ झाल्याने दिवाळीतील खुसखुशीत, वैचारिक खाद्य असलेला ‘अक्षर फराळ’ मात्र महागला आहे. अर्थात, किमतींमध्ये वाढ झाली असली, तरी दिवाळी खरेदीमध्ये दिवाळी अंकांचा प्राधान्यक्रम घसरलेला नाही. त्यामुळे या वर्षी दिवाळी अंकांची उलाढाल १२ कोटीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. दिवाळी अंकांच्या खरेदीमध्ये पुणे आघाडीवर असून, पुणेकर या उलाढालीमध्ये ५० टक्के वाटा उचलतात. मुंबईकर २५ टक्के, तर उर्वरित महाराष्ट्र मिळून २५ टक्के अशी साधारणपणे आकडेवारी असते.

कागदावरील ‘जीएसटी’ १२ वरून १८ टक्के झाल्याने यंदा दिवाळी अंकांची किंमत ५० ते १०० रुपयांनी वाढली. दिवाळी अंकांनी पहिल्यांदाच ४५० रुपयांचा टप्पा पार केला. त्यामुळे आवडत्या अंकांच्या खरेदीसाठी चोखंदळ वाचकांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. मात्र, तरीही शतक पार केलेली दिवाळी अंकांची परंपरा टिकून राहावी आणि आपल्या आवडीचे अंक वाचता यावेत या उद्देशाने नागरिकांनी दिवाळी अंकांच्या खरेदीकडे पाठ फिरवलेली नाही, असे चित्र असल्याची माहिती अक्षरधारा बुक गॅलरीचे रमेश राठिवडेकर यांनी दिली.

‘जीएसटी’तील १२ टक्क्यांचा टप्पा रद्द करण्यात आला आहे. आता पाच आणि १८ टक्के असे दोनच टप्पे आहेत. अनेक वस्तूंवरील ‘जीएसटी’ कमी झालेला असताना कागदावरील ‘जीएसटी’ सहा टक्क्यांनी वाढल्याने कागदाच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे अनेक प्रकाशकांनी प्रतींची संख्या कमी केली आहे; तसेच किमतीतही १५ ते २० टक्क्यांनी वाढ केली आहे. गेल्या वर्षी पाच हजार प्रती छापून घेतलेल्या प्रकाशकांनी यंदा वाढलेल्या खर्चाचा परिणाम म्हणून तीनच हजार प्रती छापल्या आहेत.

बाजारात तीनशेहून अधिक दिवाळी अंक विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अगदी २० रुपयांपासून ४५० रुपयांपर्यंत दिवाळी अंकाची किंमत आहे. विविध प्रकारच्या अंकांची वाचकांकडून खरेदी केली जात असल्याने दिवाळी अंकांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरांबरोबर ग्रामीण भागातूनही ग्रंथालये, वाचनालयांसाठी दिवाळी अंकांची खरेदी केली जात आहे. ‘लोकसत्ता’सह वाङ्मयीन, विनोदी, आरोग्य, ज्योतिषविषयक, आध्यात्मिक, पाककृतीविषयक, चित्रपट, दुर्ग, अर्थविषयक, राशी भविष्य, पर्यटन, शैक्षणिक, क्रीडा, मुलांचे अंक, रहस्य कथा विशेषांक, स्पर्धा परीक्षाविषयक अंक यंदा उपलब्ध आहेत.

मौज, हंस, नवल, मोहिनी, धनंजय, अक्षर या सर्वाधिक पसंतीच्या दिवाळी अंकांच्या किमती ४०० ते ४५० रुपये झाल्या आहेत. काही दिवाळी अंकांना विलंब झाल्याने एकत्रित संचाचे नियोजन बिघडले आहे. दिवाळीच्या धामधुमीत दिवाळी अंक खरेदी करण्याचा आनंद असतो. त्याप्रमाणे खरेदीसाठी सध्या गर्दी होत आहे, याकडे राठिवडेकर यांनी लक्ष वेधले.

‘नवल’ आणि ‘धनंजय’ हे रहस्य आणि गूढ कथांसाठी प्रसिद्ध अंक असले, तरी रहस्यकथांच्या अंकांत आता मोठी भर पडली आहे. ‘भयकथा’, ‘हेर’, ‘थरार’, ‘गुन्हेगार’, ‘मास्टर की’, ‘अपराध’, ‘पाठलाग’, ‘गुप्तहेर’ असे अनेक दर्जेदार अंक प्रसिद्ध होऊ लागले आहेत. विनोदी कथांमध्ये ‘आवाज’, ‘मोहिनी’, ‘जत्रा’ या अंकांची जादू कायम आहे. मुला-मुलींसाठी ‘किशोर’, ‘साधना बालकुमार’ या अंकाबरोबर ‘चिकू-पिकू’ आणि ‘कुल्फी’ हे अंक सध्या गाजत आहेत. आरोग्य विषयावरील ‘शतायुषी’ पुन्हा प्रसिद्ध झाला आहे. ‘छात्र प्रबोधन’ हा एकमेव अंक इंग्रजीत प्रसिद्ध झाला आहे. ‘नृत्यावकाश’ हा नृत्य विशेषांक आहे.

‘‘तीनशे रुपयांच्या वर्गणीत सर्व अंक’ ही योजना सुरू केली असून, त्यामध्ये वाचकांना केवळ वाचण्यासाठी अंक मिळतील,’ असे उत्कर्ष प्रकाशनाचे संचालक सु. वा. जोशी यांनी सांगितले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांचा फटका बसल्याने अमेरिकेत दिवाळी अंक जाऊ शकले नसले, तरी दुबई, श्रीलंका, न्यूझीलंडसह आठ देशांमध्ये शंभर दिवाळी अंक रवाना झाले आहेत. दुबई येथील महाराष्ट्र मंडळामध्ये शिवानी राठिवडेकर यांनी लावलेल्या ‘अक्षरधारा’च्या दालनामध्ये तेथील मराठी वाचकांनी दीडशेहून अधिक अंक विकत घेतले.- रमेश राठिवडेकर, संचालक, अक्षरधारा बुक गॅलरी