पुणे : “मुलीने जर सोमवारचा उपवास केला, तर तिला चांगला मुलगा मिळू शकतो. पण, पोरांनो तुम्हाला उपवास करून चांगली मुलगी मिळणार नाही. तुम्हाला एमपीएससीत सिलेक्ट व्हावे लागेल”, असे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी म्हणताच उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये मोठा हशा पिकला.

राज्यसेवा मुख्य परीक्षा नवीन पॅटर्न २०२५ पासून राबविण्यात यावा, या मागणीसाठी पुण्यातील अलका टॉकीज चौकात स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांकडून साष्टांग दंडवत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राज्य सरकारमधील भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अभिमन्यू पवार आणि रयत क्रांती संघटनेचे माजी आमदार सदाभाऊ खोत हे सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अहिल्या शिक्षण मंडळाच्या हॉलमध्ये गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सदर विधान केले.

हेही वाचा – कसब्यात आता भावनिक रंग

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांच्या भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समजल्या. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळात तातडीने परीक्षेबाबत निर्णय घेतला आहे. हा विजय विद्यार्थी वर्गाचा आहे. तसेच, या निर्णयानंतर ज्यांच्या पोटात दुखत असेल त्यांना चुन्याची गोळी देऊ, अशा शब्दात महाविकास आघाडीतील नेत्यांवर पडळकर यांनी टीका केली.

हेही वाचा – पुण्यात अप्पा बळवंत चौकामध्ये कोयता गँगकडून महाविद्यालयीन युवकावर वार, दोन अल्पवयीन मुले ताब्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य सरकारने एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अलका टॉकीज चौकात सकाळपासून आंदोलनाच्या ठिकाणी बसलेल्या विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. गोपीचंद पडळकर आणि अभिमन्यू पवार या दोन्ही नेत्यांना विद्यार्थ्यांनी अलका टॉकीज चौक ते अहिल्या शिक्षण मंडळापर्यंत खांद्यावर बसून मिरवणूक काढली.