पुणे : शिपायाच्या सरकारी नोकरीसाठी दहावी उत्तीर्णापासून पदव्युत्तरापर्यंत लाखो उमेदवार अर्ज करीत असताना नुकताच एक सरकारी रोजगार मेळावा मात्र ओस पडला. खडकीमध्ये कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागाने २२ जुलैला रोजगार मेळावा आयोजिला. त्यात एक हजार ४०८ रिक्त पदे भरण्यात येणार होती. परंतु, या मेळाव्याला केवळ १५२ उमेदवारांनी हजेरी लावली आणि त्यातील फक्त सात जणांची नोकरीसाठी अंतिम निवड झाली.

जिल्हा कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडून पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यांचे आयोजन केले जाते. यातील एक मेळावा २२ जुलैला खडकीमध्ये झाला. त्यात पुणे जिल्ह्यातील औद्योगिक परिसरातील एकूण २६ कंपन्यांनी सहभाग नोंदविला. या कंपन्या त्यांच्याकडील विविध प्रकारची एकूण १ हजार ४०८ रिक्त पदे भरणार होत्या. प्रत्यक्षात या मेळाव्यात १५२ बेरोजगार तरुणांनीच सहभाग नोंदविला. रोजगार मेळाव्याच्या ठिकाणी या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यात ८७ उमेदवारांची प्राथमिक फेरीसाठी निवड झाली आणि त्यातून सात उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली.

मेळाव्यात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर आणि आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी जागा होत्या. या मेळाव्यात सेवा क्षेत्रातील काही कंपन्यांसह उत्पादन आणि बँकिंग व विमा क्षेत्रातील कंपन्यांचाही सहभाग होता. सरकारी रोजगार मेळाव्यांना बेरोजगार तरुणांचा प्रतिसाद दिवसेंदिवस कमी होत आहे, अशी माहिती या विभागातील अधिकारी खासगीत देत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी उपक्रम

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलैला वाढदिवस असल्याने कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता विभागाने एकाच दिवशी पाच कार्यक्रमांचे आयोजन केले. त्यात खडकीत रोजगार मेळावा, जिल्ह्यात दोन ठिकाणी प्लेसमेंट ड्राइव्ह आणि दोन ठिकाणी करिअर समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे विभागाने १३ जुलैलाच एक रोजगार मेळावा आयोजिला होता. त्या वेळी दोन हजार जागांसाठी ५०० उमेदवार आले होते. विभागाकडून एका तिमाहीत एक असे वर्षाला चार मेळावे घेतले जातात. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी आठच दिवसांत पुन्हा मेळावा घेण्याचा खटाटोप करण्यात आला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता विभागाकडून जिल्ह्यात वर्षभरात चार रोजगार मेळावे घेतले जातात. आम्ही नुकताच एक मेळावा घेतला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर लगेचच हा मेळावा झाल्याने बेरोजगार तरुणांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. – सागर मोहिते, सहायक आयुक्त, कौशल्यविकास, रोजगार, उद्योजकता विभाग.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सरकारी रोजगार मेळाव्यात मिळणारे रोजगार प्रामुख्याने प्रशिक्षणार्थी पातळीवरील असतात. त्याचबरोबर वेतनही कमी दिले जाते. या मेळाव्यात रोजगार मिळालेल्या तरुणांना वर्षभरानंतर कामावरून काढून टाकले जाते. त्यांना पूर्ण वेळ नोकरी नाकारली जाते. अशा उमेदवारांनी पुन्हा मेळाव्याला हजेरी लावल्यानंतर त्यांना पुन्हा प्रशिक्षणार्थी म्हणूनच संधी दिली जाते. यामुळे बेरोजगार तरुण या मेळाव्याकडे पाठ फिरवतात. – ओंकार मोरे, कौशल्य प्रशिक्षण संस्थाचालक.