लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य एल १ या सौर मोहिमेत समाविष्ट असलेल्या सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (सूट) या दुर्बिणीने महत्त्वाची कामगिरी केली आहे. या दुर्बिणीकडून सूर्याचे पहिले प्रकाशचित्र प्राप्त झाले असून, या छायाचित्रांतून सूर्यावरील वातावरणीय थर दिसून येत आहे.

सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल १ हे अवकाशयान सप्टेंबरमध्ये प्रक्षेपित करण्यात आले. या यानावरील सूट या दुर्बिणीची निर्मिती पुण्यातील आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका) आणि भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) यांनी केली आहे. सूर्याविषयीच्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे देण्याबरोबरच अतिनील तरंगलांबीतील अद्ययावत निरीक्षणे ‘सूट’मुळे मिळू शकणार आहेत. तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सूर्याच्या अतिनील किरणांचा अभ्यास करणाऱ्या मोजक्या देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.

आणखी वाचा-येरवड्यात कोयता गँगची दहशत; अल्पवयीन मुलांकडून तोडफोड

सूट ही दुर्बिण २०० ते ४०० नॅनोमीटर (अतिनील) या तरंगलाबीसाठी तया करण्यात आली आहे. त्यामुळे सूर्याच्या फोटोस्फिअर आणि क्रोमोस्फिअर या थरांची उच्च दर्जाची प्रकाशचित्रे टिपण्यास ही दुर्बिण सक्षम आहे. ही दुर्बिण २० नोव्हेंबरला कार्यान्वित करण्यात आली. त्यानंतर ६ डिसेंबरला या दुर्बिणीने सूर्याची छायाचित्रे यशस्वीरित्या टिपल्याची माहिती आयुकाने दिली. या प्रकाशचित्रांतून क्रोमोस्फिअर आणि फोटोस्फिअरसारखा सूर्याचा पृष्ठभाग आणि वातावरणीय थर असल्याचे निदर्शनास आले आहे. या दुर्बिणीद्वारे घेतल्या जाणाऱ्या नोंदीमुळे सूर्याच्या अभ्यासासाठी मोलाच्या ठरणार आहेत. तसेच देशभरातील संशोधन संस्था, विद्यापीठांतील शास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणात विदा उपलब्ध होऊ शकणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अत्यंत व्यामिश्र अशा प्रकारच्या दुर्बिणीची निर्मिती करण्याची संधी मिळणे ही फार मोठी बाब आहे. त्याशिवाय आता या दुर्बिणीने पूर्ण सूर्यबिंबाची पहिली प्रकाशचित्रेही टिपली आहेत. या प्रकाशचित्रांतून सूर्यावरील तपशील दिसत आहेत. त्यामुळे आता सूर्य, तेथील वातावरण, तेथील घडामोडींच्या सखोल अभ्यासाचा मार्ग मोकळा झाला आहे, असे सूटचे मुख्य संशोधक प्रा. दुर्गेश त्रिपाठी यांनी सांगितले. तर सूट दुर्बिणीने टिपलेल्या छायाचित्रांद्वारे सूर्याच्या बाह्य भागाचे भौतिकशास्त्र उलगडण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ही छायाचित्रे महत्त्वाची आहेत, असे आयुकाचे संचालक प्रा. आर. श्रीआनंद यांनी सांगितले.