पुणे : कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रवासाची पार्श्वभूमी नसलेल्या नागरिकांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या उत्परिवर्तनाने पुणे आणि मुंबई शहरांमध्ये समूह संसर्गाचे स्वरूप धारण केल्याचे स्पष्ट होत आहे. बुधवारी राज्यात, विशेषत: पुणे आणि मुंबईत ज्या ८५ रुग्णांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाला, त्यांपैकी इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅ ण्ड रिसर्च (आयसर) ने केलेल्या ३८ नमुन्यांच्या चाचण्यांमधून ही बाब स्पष्ट झाली आहे.

राज्यात गुरुवारी १९८ जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचे एन.आय.व्ही संस्थेच्या अहवालातून निष्पन्न झाले. यापैकी ३० जणांनीच आंतरराष्ट्रीय प्रवास केला होता. याचाच अर्थ ओमायक्रॉनचा प्रसार स्थानिक पातळीवर वाढू लागल्याची ही लक्षणे असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. राज्यात आतापर्यंत ओमायक्रॉनचे ४५० रुग्ण आढळले आहेत.  करोना रुग्णसंख्येत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुण्यातच मोठय़ा प्रमाणावर वाढ झाली आहे. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, पुणे आणि मुंबई येथील करोना रुग्णांचे नमुने आयसरमध्ये जनुकीय क्रमनिर्धारण पाठवण्यात आले होते. या ३८ रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारणातून पुणे,पिंपरी-चिचंचवड, पुणे जिल्ह्याचा उर्वरित ग्रामीण भाग, मुंबई आणि मुंबईतील उपनगरांमध्ये समूह संसर्ग सुरू झाल्याचे दिसत आहे. या रुग्णांपैकी कोणीही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही.