पुणे : औषधांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्यात आल्यानंतर औषध नियंत्रकांनी कंपन्या आणि वितरकांना सुधारित किमतीत ग्राहकांपर्यंत औषधे पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर आता ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने सर्व औषधविक्रेत्यांच्या सहकार्याने ग्राहकांना २२ सप्टेंबरपासून स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्याचे पाऊल उचलले आहे. यामुळे जुनी किंमत असलेली औषधेही नवीन किमतीत ग्राहकांना मिळतील.
जीएसटी परिषदेने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील करात कपात केली आहे. कर्करोगासह इतर दुर्मीळ विकारांवरील ३३ प्रकारची जीवनावश्यक औषधे आता करमुक्त असतील. त्याच वेळी इतर बहुतांश औषधांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. वैद्यकीय उपकरणांवरील जीएसटीही आता ५ टक्क्यांवर आणण्यात आला आहे.
जीएसटीमधील बदलांनुसार सुधारित किमतीची औषधे आणि वैद्यकीय उपकरणे बाजारात येण्यास सुमारे ९० दिवसांचा कालावधी लागण्याचा अंदाज आहे. त्यामुळे २२ सप्टेंबरपासून जीएसटीतील कपात गृहीत धरून औषधांच्या किमती विक्रेते कमी करणार आहेत. त्याचा फायदा थेट ग्राहकांना होणार आहे.
ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स असोसिएशनने याबाबत देशभरातील सर्व औषधवितरक आणि विक्रेत्यांना सूचना केल्या आहेत. असोसिएशनने म्हटले आहे, की नवीन छापील किंमत असलेली औषधे ९० दिवसांत बाजारात हळूहळू उपलब्ध होतील.
सरकारच्या आदेशानुसार २२ सप्टेंबरपासूनच ग्राहकांना कमी झालेल्या कराचा फायदा देणे बंधनकारक आहे. त्यामुळे सर्व वितरक आणि औषधविक्रेत्यांनी बदललेल्या जीएसटी दरानुसार औषधांच्या किमतीत बदल करून विक्री करावी. याबाबत वितरक आणि विक्रेत्यांनी त्यांच्या देयक यंत्रणेत आवश्यक ते बदल करून घ्यावेत.
औषधांच्या किमतीतील बदल
जुना जीएसटी – नवीन जीएसटी – किमतीतील कपात (टक्क्यांत)
- १८ – ५ – ११.०२
- १२ – ५ – ६.२५
- १२ – ० – १०.७२
- ५ – ० – ४.७७
औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या किमतीत २२ सप्टेंबरपासून बदल करणे बंधनकारक असल्याने त्याआधी औषधवितरक आणि विक्रेत्यांनी देयक यंत्रणेत बदल करणे आवश्यक आहे. त्यामुळे वितरक आणि विक्रेत्यांना जीएसटीतील बदलानुसार देयक प्रणालीत सुधारणा करण्यासाठी असोसिएशनकडून मदत केली जाणार आहे. लवकरात लवकर हे बदल पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. – अनिल बेलकर, सचिव, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट.