पुणे ग्रामीण भागातील विविध मार्गांवर पीएमपीने बंद केलेली सेवा पुन्हा पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्याचे सांगत राजकीय पक्षांनी केलेली मागणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असून पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तशी सूचना पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांना केली आहे.
दरम्यान, या सूचनेनुसार येत्या काही दिवसांत या मार्गावर पुन्हा सेवा सुरू केली जाईल, असे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा- वसंत मोरेंना राष्ट्रवादीच्या ‘मागणी’मुळे पुण्यातील राजकीय समीकरणांत नवी बेरीज-वजाबाकी

आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुणे, पिंपरी-चिंचवडमधील नगरसेवक आणि जिल्ह्यातील आमदारांनी ग्रामीण भागात मार्ग सुरू केले होते. ग्रामीण भागातील संचलनासाठी येत असलेला खर्च आणि मार्गांतून मिळणारे उत्पन्न यामध्ये मोठी तफावत आढळून आल्याने ओमप्रकाश बकोरिया यांनी पहिल्या टप्प्यात बारा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची कार्यवाही २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली होती. ग्रामीण भागातील सेवा बंद झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात काही मार्गांवर जादा गाड्या सोडण्यासही प्रारंभ झाला होता. मात्र या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोध दर्शविला होता. सेवा सुरू न केल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला होता. ग्रामीण भागातील प्रवाशांनाही सेवा सुरू करण्यासंदर्भात सातत्याने मागणी केली होती. त्यानुसार चंद्रकांत पाटील यांनी सेवा पूर्ववत करण्याची सूचना पीएमपी प्रशासनाला केली. ग्रामीण भागातील नागरिकांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

हेही वाचा- पुणे : हमाल, तोलणारांच्या मागण्यांसाठी हमाल पंचायतीकडून उपोषण सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीएमपी प्रशासनाने नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस ११ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. तर डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला अजून १२ मार्गांवरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासनाच्या या निर्णयाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्यात येत होती.