शिंदे आणि फडणवीस सरकारमधील पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी रविवारी जळगावमधील एका कार्यक्रमामध्ये केलेल्या एका विधानावरुन नवीन वाद निर्माण झाला आहे. “मंत्र्यांपेक्षा डॉक्टर बरे. स्त्रीरोग तज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारा कधीही स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील यांनी एक जाहीर कार्यक्रमातील भाषणात म्हटलं आहे. यावरून आता नव्या वादाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.

हेही वाचा : पुण्यात केंद्र सरकारविरोधात सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘जनआक्रोश’ आंदोलन

माध्यमांना प्रतिक्रिया देताना रुपाली पाटील म्हणाल्या, “गुलाबराव पाटील हे मूळ व्यवसायाने पानाला चुना लावणारे आहेत. कुठलाही व्यवसाय वाईट नसतो, परंतु पानटपरी ते मंत्रीपदार्यंतचा जो प्रवास आहे. त्यामध्ये त्यांच्या बुद्धीचा विकास झालेला दिसत नाही. आपण कोणत्या कार्यक्रमात कुठलं उदाहरण देतोय, याचं भान मंत्र्यांनी ठेवलं पाहिजे. परंतु मूळातच मी सांगते की, जे हे गद्दार मंत्री आहेत यांना कुठलाही बुद्धीमत्तेचा किंवा महाराष्ट्राच्या विकासाचं कोणतंही एक धोरण जर तुम्ही दाखवलं, तर मी म्हणाल ते हारेल. पुन्हा गुलाबराव पाटलांना म्हणजे त्यांनी जे वक्तव्य केलं, की स्त्री रोग तज्ज्ञ हे हातपाय बघत नाहीत म्हणजे हा काय तर्क झाला. मला वाटतं ते हातपाय नसू दे बघत पण तुम्हाला येणाऱ्या भविष्यकाळात परत मंत्रीपदावरून पानटपरीवर चुना लावायला बसावं लागणार आहे.”

सतत वाक्यातून, कृत्यातून महाराष्ट्राचा आणि महिलांचा अपमान –

तसेच, “काय उदाहरण देताय, काय आदर्श ठेवताय अक्षरशा लाजीरवाणी गोष्ट आहे. कुणाचे दौरे कसे असतात, कुणाचं वक्तव्यं काय आहे. मुख्यमंत्री शिंदेंना मला विचारायचं आहे की, अशी अडाणी लोक घेऊन तुम्ही महाराष्ट्र चालवणार आहात का? की जे सतत वाक्यातून, कृत्यातून महाराष्ट्राचा, महिलांचा अपमान होईल. असं सातत्याने करणाऱ्या लोकांपासून खरंच महाराष्ट्र वाचवला पाहिजे आणि धन्य आहेत गुलाबराव पाटील तुम्ही परत चुना लावायला टपरीवर या.” असंही रुपाली पाटील यांनी यावेळी बोलून दाखवलं.

“स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि…”; गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त विधान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुलाबराव पाटील यांनी जळगावात एका कार्यक्रमामध्ये डॉक्टर आणि मंत्र्यांमधील साधर्म्य सांगताना भाषणादरम्यान हे विधान केलं आहे. “एक हजार लोकांची ओपीडी होती. त्याचा निकाल आठ ते दहा असा दोन तासात लावला. डॉक्टर तरी बरे आमच्यापेक्षा (मंत्र्यांपेक्षा). जनरल फिजिशियन, आर्थोपेडिक, हृयदरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ. स्त्रीरोग तज्ञ असतात. स्त्रीरोग तज्ञ कधी हात-पाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधी स्त्रीरोग तज्ञ होऊ शकत नाही,” असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले आहेत.