पुणे : खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या चौथ्या टप्प्यातील मेट्रो मार्गिकेच्या विस्तारीकरणांतर्गत महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) खडकवासला येथे २० हेक्टर जागेत कारशेड (डेपो) उभारणार आहे. त्यासाठी महामेट्रोने केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राची (सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन – सीडब्ल्यूपीआरएस) २० हेक्टर जागा निश्चित करून भूसंपादनासाठी मागणी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, सीडब्ल्यूपीआरएसने जागा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट करत संबंधित प्रस्ताव फेटाळला आहे. याबाबत केंद्रीय सरकारकडे पुन्हा प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय महामेट्रोने घेतला आहे.

शहराच्या पूर्वेकडून दक्षिण उत्तर आणि मध्य भागात सहज सुलभ प्रवास करता यावा, उपनगरीय वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा म्हणून महामेट्रोकडून खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी या चौथ्या मार्गिकेचा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. ३१.६४ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पावर २८ स्थानके असून राज्य सरकारकडून ९,८९७ कोटींचा खर्च निर्धारित करत ऑक्टोबर २०२४ मध्ये या प्रस्तावित मार्गिकेला मंजुरी दिली आहे. मात्र, केंद्र सरकारची या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. या मेट्रो प्रकल्पातील कारशेड हे खडकवासला येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी महामेट्रोने सीडब्ल्यूपीआरएसच्या कार्यक्षेत्रातील २० हेक्टर मोकळ्या जागेची मागणी केली आहे. त्यासाठी महामेट्रोने ऑक्टोबर २०२४ मध्ये सीडब्ल्यूपीआरएसला जागेसंदर्भात प्रस्ताव पाठविला. तसेच जून २०२५ मध्ये पुन्हा स्मरणपत्र पाठवून जागेची मागणी केली. त्यानुसार सीडब्ल्यूपीआरएसने जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत ऑक्टोबर महिन्यात हा प्रस्ताव फेटाळला आहे.

खडकवासला येथील सीडब्ल्यूपीआरएसची सुमारे ४०० एकर जागा आहे. या ठिकाणी विविध प्रयोग, प्रकल्पांबाबत संशोधन, प्रात्यक्षिकांची उभारणी, इमारती आणि कार्यालये आहेत. प्रकल्पांवरील संशोधन, अभ्यासासाठी भौगोलिक रचनेनुसार या संपूर्ण जागेचा वापर केला जातो. त्यामुळे मेट्रोला जागा देणे शक्य नाही, असे सीडब्ल्यूपीआरएसने महामेट्रोला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे.

शहराच्या दक्षिणेकडे महामेट्रोच्या कारशेडसाठी खडकवासल्यातील जागा पूरक आहे. त्यानुसार मेट्रोचे कारशेड खडकवासला येथे उभारण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, सीडब्ल्यूपीआरएसने जमीन देण्यास नकार दिला आहे. याबाबत केंद्र सरकारच्या नगरविकास विभागाकडे पुन्हा प्रस्ताव पाठवून जागेसंदर्भात मागणी करण्यात येईल. – आर. टी. शिंदे, अपर जिल्हाधिकारी, महामेट्रो, पुणे.

महामेट्रोकडून जागेबाबत मागणी करण्यात येत आहे. मात्र, ही केंद्रीय संस्था असून या ठिकाणी देशभरातील धरणांच्या भविष्यातील सुरक्षिततेसंदर्भात संशोधन केले जाते. त्यासाठी प्रात्यक्षिके, कार्यशाळा, चाचण्या आदी प्रक्रियांसाठी जागेचा वापर केला जातो. महामेट्रोला जागा देणे शक्य नसल्याचे कळविण्यात आले आहे.डाॅ. प्रभातचंद्र, संचालक, सीडब्ल्यूपीआरएस