पुणे : कर्करोगावरील उपाचारांसाठी केमोथेरपी घेताना डोक्यावरील केस, पर्यायाने आत्मविश्वासही गमावून बसलेल्या रुग्णांसाठी केस दान करण्याच्या आवाहनाला देशभरातील नागरिकांकडून घवघवीत प्रतिसाद मिळाला आहे. रविवारी हेअर फॉर होप इंडियातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘कट अ थॉन’ उपक्रमामध्ये देशातील २५ शहरांमध्ये सुमारे ३५० नागरिकांनी आपले केस दान केले आहेत. यात महिला, पुरुष आणि लहान मुलांनीही सहभाग नोंदवला.
कर्करोगाशी दोन हात करणाऱ्या रुग्णांना अनेक शारीरिक आणि मानसिक स्थित्यंतरांचा सामना करावा लागतो. केमोथेरपी उपचारांदरम्यान अंगावरील विशेषत: डोक्यावरील केस गमावण्यातून रुग्ण आपला आत्मविश्वास गमावुन बसतात. अशा रुग्णांसाठी केसांचे विग तयार करण्यासाठी केस दान करण्याचे आवाहन करत ‘हेअर फॉर होप इंडिया’ या संस्थेचा जन्म झाला. या संस्थेचे अनेक स्वयंसेवक नियमितपणे केस दान करतात. हे केस कर्करुग्णांना विग बनवण्यासाठी दिले जातात. हेअर फॉर होप इंडियाचे मुंबई विभाग समन्वयक लेंडिल सनी म्हणाले, ‘कट अ थॉन’ मध्ये रविवारी दिवसभरात सुमारे ३२५ जणांनी केस दान केले. यांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हेअर फॉर होप इंडियाकडे पूर्वनोंदणी केलेल्या कर्करुग्णांना प्रत्येकी पाच पोनीटेल एवढे केस विग बनवण्यासाठी मोफत दिले जाणार असल्याचेही सनी यांनी सांगितले. या उपक्रमाव्यतिरिक्तही नियमितपणे केस दान करण्यातून कर्करुग्णांच्या बरे होण्याच्या प्रवासात आपण आपले योगदान देऊ शकतो, असे आवाहन सनी
केस दान कसे कराल?
कोणतीही रासायनिक प्रक्रिया न केलेले, नैसर्गिक काळ्या, पांढऱ्या किंवा करड्या रंगाचे केस कर्करुग्णांसाठी द्यावेत. तुमचे केस १२ इंच लांब असतील तर शँपूने स्वच्छ धुवून, वाळवून ते पोनीटेल स्वरुपात बांधावेत. बांधलेल्या रबर बँडच्या वरच्या बाजूने केस कापावेत. हे केस झिपलॉक प्लास्टिक पिशवीत बंद करावेत आणि कुरिअरद्वारे – कोप विथ कॅन्सर, मुंबईच्या पत्त्यावर ते पाठवावेत, असे हेअर फॉर होप इंडियातर्फे सांगण्यात आले आहे. http://www.protectyourmom.asia या संकेतस्थळावर केस दानाबाबत अधिक माहिती उपलब्ध आहे.