लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: जातीवादी भाजपला रोखण्यासाठी एकत्र आल्याचे विरोधक सांगतात. पण, एस काँग्रेस असताना शरद पवार यांनी आमच्यासोबत निवडणूक लढविली होती. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात नितीश कुमार, ममता बॅनर्जी, फारूक अब्दुल्ला यांचा मुलगा ओमर अब्दुला हे मंत्री होते. मायावती भाजपच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झाल्या होत्या. आम्ही जातीवादी आहोत तर आमच्या सोबत निवडणूक कसे लढले, आमच्या मंत्रिमंडळात कसे होते? आम्हाला जातीवादी म्हणणारे हे सारे पक्ष भाजपच्या पंगतीत बसून जेवण करून गेल्याची टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.
शिरूर लोकसभा मतदार संघात “मोदी@९ महा- जनसंपर्क अभियान” सुरू आहे. या निमित्ताने भाजपातर्फे आळंदीत सभा झाली. शिरूरचे निवडणूक प्रमुख महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, विकास डोळस आदी उपस्थित होते.
हेही वाचा… आता पुण्यातील कचरा होणार वेळेवर साफ; महापालिकेने घेतला हा निर्णय
देशातील १५ विरोधी पक्षांची बिहारमधील पाटण्यात बैठक झाली. त्यांचा अजेंडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हरवायचा आहे. पण, लालूप्रसाद यादव हे राहुल गांधी यांना म्हणाले लग्न करा आम्हाला तुमच्या वरातीत नाचायचे आहे. त्यामुळे ही बैठक लग्न जमवायला गेले होती की मोदी यांना हरविण्यासाठी होती? बैठकीत काही गांभीर्य होते की नव्हते. आंतरराष्ट्रीय स्तरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची उंची वाढविली. जगाच्या पाठीवर देशाची एवढी पत कधीही नव्हती. वाहिन्यांवर मोदी यांच्याशिवाय कोणतीही बातमी नाही.
हेही वाचा… खंडाळा घाटात ट्रकच्या धडकेने टेम्पो चालकाचा मृत्यू; दोघे जखमी
चार दिवसांपासून त्यांच्या दौऱ्याच्या बातम्या आहेत. यापूर्वीच्या पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या बातम्या येत नव्हत्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणतात भारताची लोकशाही चांगली आहे आणि राहुल गांधी परदेशात जावून भारताची लोकशाही धोक्यात आल्याचे सांगतात. मोदी सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. ते पंतप्रधान झाल्याचे विरोधकांना पचनी पडत नाही. देश मजबूत माणसाच्या हातात आहे. त्यामुळे देशाची परिस्थिती चांगली आहे. २०२४ मध्ये भाजपच्या ३०० जागा येतील, असा विश्वास दानवे यांनी व्यक्त केला.