पुणे : आश्रमशाळेस टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या जुन्नरमधील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. अरुण दगडू महाकाळ (वय ५७, रा. जुन्नर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. याबाबत एका टँकरने पाणी पुरवठा करणाऱ्या व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे.
हेही वाचा >>> पुणे: पोलिसी खाक्या दाखविताच २२ लाखांची रोकड लुटल्याचा बनाव ‘असा’ झाला उघड
महाकाळ जुन्नर परिसरातील मुथाळने येथील शासकीय आश्रमशाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आहेत. शासकीय आश्रमशाळेस टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी पुरवठ्याचे बिल मंजूर केल्याने महाकाळ यांनी टँकर व्यावसायिकाकडे पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर टँकर व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. महाकाळ यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्या विरुद्ध ओतूर पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक वीरनाथ माने यांनी ही कारवाई केली.