गोवर संसर्ग रोखण्यासाठी दहा कलमी कार्यक्रम आरोग्य यंत्रणांना देण्यात आला आहे. तसेच महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम राबविण्याची सूचना आरोग्य मंत्री प्रा. डाॅ. तानाजी सावंत यांनी केली आहे.

पुणे येथे टास्क फोर्सची पहिली बैठक सोमवारी झाली. या बैठकीपूर्वी डॉ. सावंत यांनी टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आणि आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर, राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे, राज्य लसीकरण अधिकारी डॉ. सचिन देसाई यांच्याशी चर्चा केली.

गोवरचा संसर्ग थांबविण्यासाठी सर्वप्रथम ९ महिने ते ५ वर्षे वयोगटातील बालकांचे लसीकरण करण्यात यावे. लसीकरण पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. लसीकरणासाठी लागणारी यंत्रणा, लसीच्या मात्रा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. रुग्ण आढळलेल्या भागात अतिरिक्त मात्रा नऊ महिने ते पाच वर्षांच्या बालकांना देण्यात याव्यात, असे डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले.

हेही वाचा >>>पुणे : बॅडमिंटनचे फूल काढताना वीजवाहिनीच्या धक्क्याने शाळकरी मुलीचा मृत्यू

या बैठकीत दहा कलमी कार्यक्रमाबाबत चर्चा करून गोवर नियंत्रणासाठी कृती योजना निश्चित करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टर्स आणि सदस्यांनी लसीकरण तसेच विलगीकरण यावर भर देत कुपोषित बालकांकडे अधिक लक्ष देण्याची सूचना केली.

दहा कलमी कार्यक्रमाअंतर्गत ताप–पुरळ रुग्णाचे गतिमान सर्वेक्षण करणे, राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध, उद्रेक स्थळे, लसीकरण कमी असणारे भाग, दाट लोकवस्तीचे भाग, कुपोषण अधिक असणारे भाग या क्षेत्रावर विशेष भर दिला जाणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृतीआराखडाही निश्चित करण्यात आला असून ९ महिने ५ वर्षे वयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण मोहीम हाती घेण्यात येणार आहे. कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष मोहिमेअंतर्गत प्रत्येक कुपोषित मुलाला प्राधान्याने उपचारात्मक पोषण , जीवनसत्त्व अ आणि गोवर लसीकरण करण्यात येणार आहे. आंतर विभागीय समन्वयाअंतर्गत नगरविकास, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक कल्याण विभाग यांचेशी समन्वय ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शन सूचना, गोवर प्रयोगशाळा जाळे विस्तारीकरण, गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोगशास्त्रीय विशेष सर्वेक्षण आणि त्यानुसार कृतीयोजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वांगीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना आणि सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षणावर भर दिला जाणार आहे.