लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी आठ लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले पुण्यातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांनी त्यांच्या वकिलांमार्फत न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला. डाॅ. रामोड यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (१६ मे) सुनावणी होणार आहे.

महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी अतिरिक्त विभागीय आयुक्त डाॅ. अनिल रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय एसीबी) पथकाने ९ जून रोजी पकडले होते. डाॅ. रामोड यांच्या बाणेर येथील बंगल्यातून सीबीआयच्या पथकाने कागदपत्रे तसेच सहा कोटी ६४ लाख रुपयांची रोकड जप्त केली. महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला शेतकऱ्यांना देण्यासाठी डाॅ. रामोड यांनी लाच मागितल्याचे उघडकीस आले आहे. रामोड यांना विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून न्यायालयाच्या आदेशाने त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

हेही वाचा… पुणे: पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डाॅ. रामोड यांचे वकील ॲड. सुधीर शहा यांनी बुधवारी (१४ जून) विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला. रामोड यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (१६ जून) सुनावणी होणार असल्याचे त्यांचे वकील ॲड. सुधीर शहा यांनी सांगितले.