पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात सोमवारी दिवसभर पाऊस कोसळला. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली. दिवसभर झालेल्या संततधारेमुळे पिंपरी-चिंचवडमधील रस्ते जलमय झाले हाेते. साचलेल्या पाण्यातून वाहनचालक, नागरिकांना वाट काढताना कसरत करावी लागली.
गेल्या काही दिवसांपासून गायब झालेल्या पावसाने रविवारी रात्री हजेरी लावली. सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, आकुर्डी, पिंपळेगुरव, पिंपळेनिलख, सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे या सर्वच भागात पाऊस झाला. शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
पुणे-मुंबई महामार्गावर एका बाजुने महामेट्राे आणि दुसऱ्या बाजूने अर्बन स्ट्रीट, जलवाहिनीचे काम सुरू आहे. या कामामुळे ठिकठिकाणी खाेदाई करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावर माेठे खड्डेही पडले आहेत. निगडीतील टिळक चाैक ते बजाज ऑटाेपर्यंतच्या मार्गावर पाणी साचले होते. यातून वाहन चालविताना चालकांना माेठी कसरत करावी लागली. यामुळे वाहतूक संथ हाेऊन काेंडी झाली हाेती.
शहरात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. कोठेही घरात पाणी शिरले नाही. सखल भागात साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यात आल्याचे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल यांनी सांगितले.
वर्षभराची पाण्याची चिंता मिटली
पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मावळातील पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा ९९ टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरवासीयांची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे.
धरणातून विसर्ग, प्रशासन सतर्क
धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जाेर वाढल्याने धरणातून ८०० क्युसेकने पाण्याचा पवना नदीत विसर्ग करण्यात आल्याचे शाखा अभियंता रजनीश बरिया यांनी सांगितले. धरणातून येणारे पाणी, शहरात पडणाऱ्या पावसामुळे पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आपत्कालीन यंत्रणेला सतर्क राहण्याचे आदेश दिले. नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.