पुणे : यंदा राज्यात अतिवृष्टीसह पुराच्या तडाख्याने लाखो शेतकऱ्यांचे हिरवे स्वप्न वाहून गेले. दिवाळीपूर्वी वा दिवाळीत मदत मिळेल, हीच काय ती आशा. तोवर, मोठ्या मानसिक आंदोलनाचाच सामना. अशा वेळी मन मोकळे करण्यासाठी ‘शिवार हेल्पलाइन’ धावून आली आणि महिनाभरात तब्बल ७,८१९ शेतकऱ्यांसाठी ‘जीवनवाहिनी’ ठरली.

अतिवृष्टी झाल्याने आलेल्या पुरामुळे खरडून गेलेली शेतजमीन, जनावरे वाहून गेल्याने रिकामा झालेला गोठा, पिकाच्या भरवशावर घेतलेले कर्ज, मुलांचे शिक्षण वा लग्न, अशा शेकडो प्रश्नांनी शेतकऱ्यासमोर दाटलेला अंधार ऐन दिवाळीतही कायम आहे. सरकारी मदतीने किती प्रश्न सुटणार, या चिंतेने शेतकरी खचत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘शिवार हेल्पलाइन’ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विनायक हेगाणा यांनी आठ वर्षांपूर्वी ‘शिवार फाउंडेशन’ची स्थापना केली. तेव्हापासून आतापर्यंत १० हजारांहून अधिक शेतकऱ्यांचे समुपदेशन करण्यात आले आहे. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले आणि या हेल्पलाइनवरील कॉलच्या संख्येत मोठी वाढ झाली. २४ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत मनाने खचलेल्या ७ हजार ८१९ शेतकऱ्यांनी संपर्क साधला. समुपदेशनामुळे त्यांना नवी उभारी मिळाली. याशिवाय त्यांना सल्ला, आर्थिक मार्गदर्शन आणि गरज भासल्यास तत्काळ मदतही देण्यात येत आहे.

‘‘पीक वाहून गेल्याने कुटुंबाचा सांभाळ कसा करायचा, कर्ज कसे फेडायचे, काहीच सुचत नाही. काय करू कळत नाही, आता जगून तरी काय करणार,’ अशा प्रश्नांनी हैराण झालेले शेतकरी आत्महत्येशिवाय पर्याय राहिला नसल्याची भावना हेल्पलाइनवर संपर्क साधून व्यक्त करीत आहेत. कर्जाच्या ओझ्याने दबलेल्या, आपत्तीने खचलेल्या या शेतकऱ्यांना थोडा धीर हवा आहे. तो देण्यात आल्याने त्यांचे मत आणि मनपरिवर्तन झाले,’ असे हेगाणा यांनी सांगितले.

फक्त मराठवाडा किंवा विदर्भातील नाही, तर या हेल्पलाइनवर उत्तर, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रातूनही कॉल येत आहेत. पीक वाहून गेल्याने कर्ज कसे फेडणार, हा प्रातिनिधक प्रश्न आहे. परिस्थितीनुसार काहींचे कर्ज काही हजारांत, तर काहींचे काही लाखांत आहे, पण सर्वच शेतकऱ्यांवर त्याचे आता ओझे आहे आणि त्यातून मानसिक ताणही निर्माण होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कर्जाचा फेरा सुरू झाल्याने आत्महत्येचे टोक गाठले जाते. काही जणांची या नैराश्यातून शेती कायमची सुटते. ते स्थलांतर करून पुण्या-मुंबईत कामाच्या शोधात येतात, पडेल ते काम करतात.

‘नुकसान झालेल्या काही भागांत सामाजिक संस्था, नागरिकांकडून मदत केली जाते. मात्र, तुलनेने सधन भागातील शेतकऱ्याचे दु:ख दिसतेच असे नाही. ‘मुलाला शिक्षणासाठी परदेशात जायची संधी मिळाली, त्यासाठी कर्ज घेतले. पीक होते, तोपर्यंत कर्जाच्या हप्त्याची काळजी नव्हती. आता अचानक हाताशी आलेले पीक पाण्यात गेले. कर्जाचा हप्ता कसा भरणार आणि मुलाच्या शिक्षणाचे काय होणार,’ अशी भीती भोर येथील एका शेतकऱ्याने व्यक्त केली. आता काय करायचे हे कळत नाही म्हणून आत्महत्येचा विचार केल्याचेही तो शेतकरी म्हणाला. मात्र, समुपदेशनानंतर तो शेतकरी या विचारापासून परावृत्त झाला,’ असा अनुभव हेगाणा यांनी कथन केला.

मानसिक आधार

‘नैराश्यात असलेल्या शेतकऱ्यांना संस्थेच्या स्वयंसेवकांकडून मानसिक आधार दिला जातो. कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नका किंवा निराश होऊ नका. ही वेळसुद्धा निघून जाईल. आम्ही तुमच्या सोबत आहोत. कोणतीही अडचण असो, आपण त्यातून नक्की मार्ग काढण्याचा प्रयत्न करू; पण हार मानू नका, असे आवाहन केले जाते,’ असे विनायक हेगाणा यांनी नमूद केेले.शिवार हेल्पलाइन : ८९५५७७१११५कोटशेतीच्या नुकसानीमुळे ग्रामीण अर्थकारण कोलमडले आहे. शेतकऱ्यांवर त्याचा दबाव आहे. त्यांचे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत. शेतकऱ्यांना मदतीबरोबरच मानसिक आधाराचीही गरज आहे. – विनायक हेगाणा, प्रमुख, शिवार फाउंडेशन