पुणे: शहर आणि परिसरात मंगळवारी ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून रस्त्यांना तळ्याचे रूप आल्याचे चित्र होते.गेल्या काही दिवसांपासून शहर आणि परिसरातील हवामान, तापमानात बदल झाला आहे. कमाल तापमानात घट झाली आहे. दुपारनंतर वातावरण ढगाळ होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे.

हवामान विभागाने १५ मेपर्यंत पावसाचा अंदाजही वर्तवला आहे. मंगळवारी सकाळपासूनच आकाश पावसानी ढगांनी भरून आले होते. दुपारनंतर पाऊस पडण्याची चिन्हे दिसत होती. मात्र, सकाळी दहा-अकराच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी पावसाला चांगलाच जोर होता.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रात्री साडेआठपर्यंत लवळे येथे ४८.५ मिलिमीटर, कात्रज येथे २३.८, शिवाजीनगर येथे १८.७, पाषाण येथे १७.१, खडकवासला येथे १०.२, एनडीए येथे ७.५, हडपसर येथे ३, कोरेगाव पार्क येथे २ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला.कामाच्या वेळेत झालेल्या पावसामुळे नोकरदारांची धावपळ झाली. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते.

कामांसाठी काही ठिकाणी रस्ते खोदण्यात आले असल्याने पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. तसेच, जिल्ह्याच्या काही भागातही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. पुढील चार दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.