लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसाचा प्रचारावर परिणाम झाला. रॅलीवर पाणी फेरले. दरम्यान, पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला.

पिंपरी-चिंचवड शहर परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उकाडाही वाढला होता. दुपारी चारच्या सुमारास जोरदार वादळी वारे सुटले. साडेचारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातील पिंपरी, चिंचवड, भोसरी, आकुर्डी, निगडी, पिंपळेसौदागर, पिंपळेगुरव, सांगवी भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. तासभर पाऊस पडत होता. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली.

आणखी वाचा-पुणे : मुसळधार पावसामुळे शहरात दहा ठिकाणी झाडे पडली; वाहतूक विस्कळीत

शिरूर, मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी (१३ मे) मतदान होणार आहे. प्रचारासाठी शनिवारचा शेवटचा दिवस असल्याने उमेदवारांनी शुक्रवारी प्रचाराचे जोरदार नियोजन केले होते. शिरूरमधील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रॅलीचे भोसरीत आयोजन केले होते. परंतु, पावसाने रॅलीवर पाणी फेरले. मावळचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्या प्रचारासाठी पिंपरीत रॅलीचे आयोजन केले होते. त्यावरही पाणी फेरले आहे.