पुणे : राज्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावल्याचा फटका सोमवारीही विमान उड्डाणांना बसला. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नियोजित पाच विमाने रद्द करण्यात आली.
विमान कंपन्यांनी काही प्रवाशांची पर्यायी विमानांत सोय केली. ज्या प्रवाशांची सोय करणे शक्य नाही, त्यांना तिकिटांचा पूर्ण परतावा देण्यात आला. शहरात रविवारी रात्री जोरदार पावसामुळे १४ विमानांच्या उड्डाणांना फटका बसला. ही विमाने हैदराबाद, मुंबई, चेन्नई या विमानतळांवर उतरविण्यात आली. सोमवारीही दिवसभर खराब वातावरण होते. पुणे विमानतळावरून उडालेली तीन विमाने माघारी परतली.
‘विमानतळावरील परिस्थिती हळूहळू पूर्ववत होत आहे. उड्डाणे पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच नियोजनानुसार उड्डाणे होतील,’ अशी माहिती पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक संतोष ढोके यांनी दिली.
प्रवाशांना त्रास
हवामान विभागाने पुणे शहरात १४ सप्टेंबर रोजी ऑरेंज अलर्ट दिला होता. त्यानुसार पुणे शहर आणि विमानतळ परिसरात रात्रभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. खराब हवामानामुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम जाणवून आला. परराज्यातून आणि जिल्ह्यातून १७ विमाने रात्री उशिरा उतरणार असताना तीन विमाने पुणे विमानतळावर माघारी उतरली, तर १४ विमाने इतर ठिकाणच्या विमानतळांवर उतरविण्यात आली. मात्र, सोमवारी दुपारी ४.३० वाजेपर्यंत खराब वातावरणाचा फटका बसला. त्यामुळे बडोदा, दिल्ली, नागपूर, चेन्नई आणि जोधपूर येथून पुणे विमानतळावर येणारी उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवासी विमानतळांवर अडकून पडले, तर काहींना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा लागला. त्याचबरोबर ही विमाने पुणे विमानतळावरून दुसऱ्या ठिकाणी जात असल्याने पुणे विमानतळावर प्रवाशांना विमानांची प्रतीक्षा करावी लागली.
विमान प्रवासाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या विमानात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्यात आली, तर उर्वरित प्रवाशांना तिकिट शुल्काचे पैसे माघारी द्यावे लागले. मात्र, नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक कारणामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांना मात्र याचा मोठा फटका सहन करावा लागला.
रद्द करण्यात आलेली विमाने
- बडोदा-पुणे-जोधपूर
- दिल्ली-पुणे-दिल्ली
- जोधपूर-पुणे
- नागपूर-पुणे
- चेन्नई-पुणे-चेन्नई