पुणे : सतत कोसळणाऱ्या पावसामुळे धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील लखी गाव संपूर्ण पाण्याखाली गेले. या परिस्थितीत नागरी प्रशासनाच्या विनंतीवरून लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने मदतकार्य केले. त्यात घराच्या छतावर अडकलेल्या २७ नागरिकांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली.

संरक्षण विभागाने याबाबतची माहिती दिली. लखी गावातील १२ नागरिक एका घराच्या छतावर अडकले होते. त्यांची सुटका करण्यासाठी नागरी प्रशासनाने लष्कराला विनंती केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ‘थार रॅप्टर्स ब्रिगेड’च्या पथकाने प्रतिकूल हवामानातही हेलिकॉप्टरच्या मदतीने मदतकार्याची मोहीम राबवली. लष्करी वैमानिकांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने एकूण २७ नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केले.

बीड, धाराशिव भागात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे बीड, शिरूर, पाटोदा, आष्टी आणि गेवराई तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. तसेच भूम-परंडा अशा भागांतही पूरपरिस्थिती निर्माण झाली. प्रशासनासह एनडीआरएफ, लष्कराच्या साहाय्याने मदतकार्य राबवण्यात आले.