पुणे : मकरसंक्रातीच्या सणानिमित्त पतंग उडविण्यासाठी वापरात येणाऱ्या मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांच्या बचावकार्यासाठी पुण्यामध्ये हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.  सर्वजीव मंगल प्रतिष्ठानच्या वतीने ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून चीनी मांजाची छुपी विक्री थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.

संक्रांतीच्या निमित्ताने शहरातील वेताळ टेकडी, तळजाई टेकडी, हनुमान टेकडी यासह अन्य ठिकाणी पतंग उडवण्यास लोक जातात. इथे अनेकदा मांजा झाडावर अडकलेला दिसतो. हा मांजा जमा करून आणून देणाऱ्यांना बक्षीस दिले जाणार आहे, असे सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कल्याण गंगवाल यांनी शुक्रवारी सांगितले.

डॉ. गंगवाल म्हणाले, की चीनी मांजा सापडल्यास संबंधितांवर पाच वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या आर्थिक दंडाची तरतूद आहे. मात्र, शासकीय यंत्रणेच्या ढिलेपणामुळे हा मांजा बाजारात विकला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या आधी घडलेल्या दुर्घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन चीनी मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. तसेच राष्ट्रीय हरित लवादाने याप्रकरणी लक्ष घालावे.

या मांजामुळे माणसांसह अनेक पक्षीही जखमी होतात. त्यामध्ये कबुतर, कावळा, घुबड, पोपट, घार आणि फुलपाखरे यांचा समावेश आहे. गेल्या आठ वर्षात जवळपास अडीच हजार पक्ष्यांना वाचविण्यात यश आले आहे. यंदाही एक रुग्णवाहिका, पशुवैद्यकीय डॉक्टर आणि चार-पाच कार्यकर्ते ही बचावकार्य मोहिम महिनाभर राबविणार आहेत. त्यासाठी हेल्पलाइन सुरु करण्यात आली असून, यामध्ये रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेस्क्यू वाइल्डलाइफ टीटीसी या संस्थांचे सहकार्य मिळाले आहे.

हेही वाचा : महापालिकेची वाहन चार्जिंग सुविधा महावितरणपेक्षा महाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जखमी पक्ष्यांबाबत डॉ. कल्याण गंगवाल (मो. क्र. ९८२३०१७३४३), सुनील परदेशी (मो. क्र. ९८२३२०९१८४), गौरव गाडे (मो. क्र. ७०३०२८५५२०) किंवा रेस्क्यू वाईल्ड लाईफ (मो. क्र ९१७२५१११००) या क्रमांकावर माहिती देऊन अहिंसाप्रेमी नागरिकांनी या मोहिमेत सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. गंगवाल यांनी केले.