scorecardresearch

शहरात आजपासून हेरिटेज वॅाक उपक्रम

प्रायोगिक तत्त्वावर पुणे जाणून घ्या हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शहरात आजपासून हेरिटेज वॅाक उपक्रम
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : शहराचे महत्त्व, जडणघडण आणि जुन्या पुण्याची ओळख शहरात येणाऱ्या पर्यटकांना, नागरिकांना आणि भावी पिढीला होण्याच्या दृष्टीने हेरिटेज वॅाक उपक्रम राबविण्यात येणार आहे. पुणे जाणून घ्या, या उपक्रमाअंतर्गत दर शनिवारी आणि रविवारी हा उपक्रम सकाळी सुरू होईल. दोन तासांच्या कालावधीत २ अडीच किलोमीटर लांबीचा फेरफटका या उपक्रमामध्ये होणार असून शिवाजी पूल, घोरपडे घाट, शनिवारवाडा, कसबा गणपती, लाल महाल, नाना वाडा, जोगेश्वरी, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, भिडे वाडा, बेलबाग मंदिर, पुणे नगर वाचनालय, तुळशीबाग, मंडई, विश्रामबागावाडा आदी वास्तूंची माहिती पर्यटक मार्गदर्शनांकडून (गाईड) दिली जाणार आहे.

शरात २५० हेरिटेज वास्तू आहेत. यातील अ श्रेणी यादीतीमध्ये शनिवारवाडा, लाल महाल, विश्रामबागवाडा, नानावाडा, कसबा गणपती, महात्मा फुले मंडई आदींचा समावेस आहे. या वास्तू शहराच्या दाट वस्तीच्या भागामध्ये आहेत. शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार, शहर वाढीचा वेग आणि बदलणारे स्वरूप यामुळे शहराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व जपण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्याचे प्रस्तावित असून या उपक्रमाचे उद्घाटन शनिवारी (२० ऑगस्ट) होईल.

शहराच्या मूळ भागात पायी फिरून ऐतिहासिका वास्तू, परिसरातून पर्यटकांना शहराची जुनी ओळख या माध्यमातून करून दिली जाईल. हेरिटेज वॉकसाठी महापालिकेकडे पर्यटक मार्गदर्शक तसेच अन्य मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने उपक्रमासाठी तज्ञ व्यक्ती, संस्था यांचे सहकार्य घेण्याचे नियोजित आहे. त्यादृष्टीने संदीप गोडबोले यांनी हा प्रकल्प राबविण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या ते खासगी हेरिटेज वाॅक उपक्रम राबवित आहेत, अशी माहिती महापालिकेच्या हेरिटेज विभागाकडून देण्यात आली.

पाच वेगवेगळे हेरिटेज वॉकचा प्रस्ताव गोडबोले यांनी दिला असून पहिल्या टप्प्यात शिवाजी पूल ते महात्मा फुले मंडई या दरम्यानच्या ऐतिहासिक वास्तूंची सखोल माहिती पर्यटक मार्गदर्शकांकडून दिली जाईल. प्रायोगिक तत्त्वावर पुणे जाणून घ्या हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नागरिकांच्या प्रतिसादानुसार अन्य वेगवेगळे हेरिटेज वाॅक प्रस्तावित करण्यात येतील. तसेच नागरिकांचा आणि पर्यटकांचा प्रतिसाद पाहून हेरिटेज वाॅकमध्ये आवश्यक ते फेरबदल करण्यात येतील.

हेरिटेज वॉकमधील ऐतिहासिक वास्तूंचे जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. सध्या महापालिकेकडून लाल महाल, नाना वाडा, विश्रामबागवाडा या ऐतिहासिक वास्तूंच्या जतन आणि संवर्धनाची बहुतांश कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरीत कामे उपलब्ध तरतूदीनुसार पूर्ण करण्यात येणार आहेत. नाना वाडा येथे आद्य सशस्त्र क्रांतीकारक यांच्या जीवन चरित्रावर आधारीत संग्रहालयाचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या