पुणे : गणेशोत्सवाच्या काळात शहराच्या मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे शहरातील खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबतच्या निर्णयाला शहरातील बार अँड रेस्टोरंट चालक संघटनेने उच्च न्यायालायात याचिका दाखल करुन आव्हान दिले होते. या याचिकेवर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली. उत्सवाच्या काळात दहा दिवस मद्य विक्री दुकाने बंद घेण्याच्या आदेशाल स्थगिती देण्यात आली.
त्यानंतर आता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि अनंत चतुर्दशीला विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.
वैभवशाली परंपरा असलेल्या गणेशोत्सवात मध्य भागात मोठ्या संख्येेने भाविक येतात. उत्सवाच्या कालावधीत दररोज लाखो भाविकांची दर्शनासाठी येतात. परगाव, तसेच परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. उत्सवाच्या कालावधीत घडणारे गैरप्रकार, वाद, तसेच भांडणाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांंनी शहराच्या मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. या प्रस्तावाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली होती. त्यानुसार गेल्या वर्षी उत्सवाच्या काळात संपूर्ण दहा दिवस खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्य विक्री दुकाने (बार अँड रेस्टोरंट, वाईन शाॅप) बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर्षी मध्य भागातील मद्य विक्री दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
या निर्णयास बार अँड रेस्टाेरंट संघटना आणि मद्य विक्रेत्यांनी विरोध दर्शविला होता. मद्य विक्रेत्यांकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली. त्यानंतर उच्च न्यायालयाने मध्य भागातील मद्य विक्रीचे दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला स्थगिती दिली. त्यानुसार संपूर्ण दहा दिवस मद्य विक्री बंदीचा आदेश फेटळण्यात आल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश काढला. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने प्राणप्रतिष्ठापना सोहळा (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत.
गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी (६ सप्टेंबर) या दोन्ही दिवशी संपूर्ण जिल्ह्यातील मद्य विक्री दुकाने बंद (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तसेच ७ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत पुणे महापालिका क्षेत्रातील मिरवणुकीच्या मार्गावरील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ज्या भागात पाचव्या आणि सातव्या दिवशी विसर्जन पार पडते, त्या भागातील मिरवणुकीच्या मार्गावरील दुकाने मिरवणुकीदरम्यान बंद ठेवण्याचे आदेशही लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी (२६ ऑगस्ट) रोजी सुधारित आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे सुधारित आदेश
गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट) – संपूर्ण पुणे शहर, जिल्हा
अनंत चतुर्दशी (६ सप्टेंबर) – संपूर्ण पुणे शहर , जिल्हा
७ सप्टेंबर – विसर्जन मार्गावरील मद्य विक्री दुकाने बंद
पाचवा आणि सातवा दिवस – विसर्जन होणाऱ्या भागातील मद्य विक्री दुकाने बंद
खडक, विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाणे – २७ ऑगस्ट, ३१ ऑग्सट, २ सप्टेंबर, ६ सप्टेंबर आणि ७ सप्टेंबर विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत