पुणे : उद्योगांच्या गरजा लक्षात घेत कौशल्य शिक्षणावर भर देण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) कौशल्य शिक्षणासाठीच्या मार्गदर्शक सूचनांचा मसुदा जाहीर केला आहे. त्यानुसार उच्च शिक्षण संस्थांना प्रमाणपत्र, पदविका, प्रगत पदविका, पदवी अभ्यासक्रम सुरू करता येणार असून, विदा विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल विपणन अशा विषयांचा अभ्यासक्रमांत समावेश करून विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढवण्याची सूचना देण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांत बाजारपेठेतील गरजा आणि उच्च शिक्षण घेतलेले विद्यार्थी यात तफावत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही दरी दूर करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थ्यांच्या कौशल्य शिक्षणावर भर देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कौशल्य शिक्षणाचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठीची कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार या कार्यपद्धतीवर ३१ जानेवारीअखेरपर्यंत हरकती-सूचना नोंदवता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : दुकानदाराकडे खंडणीची मागणी करुन तोडफोड, शिवणे भागात सराइताची दहशत

कार्यपद्धतीनुसार अल्प आणि मध्यम कालावधीच्या अभ्यासक्रमांतून विद्यार्थ्यांना नेमक्या क्षेत्रातील कौशल्य प्राप्त करून त्यांची पात्रता वाढवता येणार आहे. उद्योगांशी अधिकाधिक सहयोग-सहकार्य करून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळण्यासाठी कार्यप्रशिक्षणाची सुविधा द्यावी लागणार आहे. तसेच अभ्यासक्रमांत प्रकल्प, क्षेत्रभेटींचा समावेश असणार आहे. अभ्यासक्रमाचे किमान ५० टक्के मूल्यमापन प्रत्यक्ष (ऑफलाइन) पद्धतीने करायचे आहे. तर अभ्यासक्रमांचे अध्यापन ऑनलाइन, मिश्र पद्धतीने करता येईल. या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना श्रेयांक मिळणार आहेत. हे श्रेयांक ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये साठवून आवश्यकतेनुसार हस्तांतरित करता येऊ शकतात.

अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पात्र उच्च शिक्षण संस्थांना अंतर्गत मान्यता प्रक्रिया पूर्ण करून यूजीसीकडे अर्ज करावा लागेल. यूजीसीने नियुक्त केलेली समिती अभ्यासक्रमाला मान्यता देईल. हे अभ्यासक्रम राष्ट्रीय व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम परिषदेच्या आणि राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखड्यातील निकषांनुसार असणे आवश्यक आहे.

हेही वाचा – पुणे : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा काळाबाजार, सिंहगड रस्ता पोलिसांकडून ६१ सिलिंडर जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अभ्यासक्रम सादर करण्यासाठी यूजीसीकडून उच्चतर कौशल या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्धतेसाठी करिअर समुपदेशन कक्ष, प्लेसमेंट सपोर्ट देणे आवश्यक आहे.