देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबई व पुणे या दोन्ही प्रमुख शहारांमध्ये करोना रुग्ण आढळण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंतचे एका दिवसातील सर्वाधिक ८२३ करोनाबाधित रुग्ण आढळले असून, २४ जणांचा मृत्यू झाल्याची आज नोंद झाली आहे. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची संख्या आता १५ हजार ४ वर पोहचली आहे. आतापर्यंत ५८४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे. पुण्याच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

पुण्यात  करोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहे. या रुग्णांमध्ये प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी देखील आहेत. आजअखेर ११२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली असून, त्या दरम्यान १० जणांचा मृत्यू झाला आहे. तर या पैकी ६१ जण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या ४१ जणांवर उपचार सुरू असल्याचे पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच, सध्याच्या रुग्ण संख्येच्या आकडेवारीवरून जुलै अखेर पर्यंत १८ हजार करोनाबाधित रुग्ण पुणे शहरात  असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा देशात कहर सुरू असल्याचे दिसत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात आतापर्यंतचे सर्वाधिक तब्बल १५ हजार ४१३ नवे करोनाबाधित आढळले आहेत. तर, ३०६ जणांचा करोनाने  मृत्यू झाला आहे.  देशभरातील करोनाबाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

देशात सद्यस्थितीस ४ लाख १० हजार ४६१ करोनाबाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले १ लाख ६९ हजार ४५१ जण, उपचारानंतर सुट्टी देण्यात आलेले २ लाख २७ हजार ७५६ जण व आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या १३ हजार २५४ जणांचा समावेश आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.