पुणे : बहुतप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या (मार्गिका क्रमांक ३) व्यवस्थापनाची जबाबदारी फ्रान्सच्या केओलिस कंपनीला देण्यात आली आहे. ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (पीएमआरडीए), ‘पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड’ (पीआयटीसीएमआरएल) यांनी या फ्रेंच कंपनीबरोबर पुढील दहा वर्षांसाठी करार केला आहे. या मार्गावर २२ अल्स्टॉम-निर्मित मेट्रो गाड्या चालवल्या जाणार असून, केओलिस कंपनी या गाड्यांचे व्यवस्थापन, तिकीट प्रणाली आणि सर्व स्थानकांचे नियोजन करणार आहे.
हिंजवडी ते शिवाजीनगर हा २३ किलोमीटर लांबीचा मेट्रो प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवला जात आहे. या मार्गाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. नववर्षात (मार्च २०२६) या मार्गावरील मेट्रो प्रत्यक्षात सुरू करण्याचे उद्दिष्ट ‘पीएमआरडीए’ने ठेवले असून, त्या दृष्टीने दोन ते तीन चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. या मार्गावर टप्प्याटप्प्याने एक पाऊल पुढे पडत असून, २३ स्थानकांची दुरुस्ती अंतिम टप्प्यात असल्याचे ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
शहरातील ‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित करण्यात आलेला हा एकमेव मेट्रो मार्ग असून, मार्गिकेच्या उभारणीसाठी ८,३१३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी खासगी गुंतवणूक १,३१५ कोटी रुपये, संस्थात्मक कर्ज ४,७८९ कोटी रुपये, केंद्र सरकारचा व्यवहार्यता अंतर निधी (गॅप फंंडिंग) १,२२४.८ कोटी रुपये आणि राज्य सरकारचे योगदान ९०.५८ कोटी रुपये असे निश्चित करण्यात आले आहे.
‘हा मार्ग पुण्यातील ‘आयटी हब’ असलेल्या हिंजवडी आणि शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजीनगर यांना जोडणारा आहे. यामुळे विशेषतः हिंजवडीतील आयटी व्यावसायिकांना आणि इतर दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. तसेच, वाहतूक कोंडीतून सुटका होण्याबरोबरच प्रवासाचा वेळही कमी होण्यास मदत होणार आहे,’ अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी दिली.
मेट्रोत सर्व महिला लोकोपायलट
या प्रकल्पात एक उल्लेखनीय पाऊल म्हणून ‘केओलिस’ने सर्व महिला मेट्रो चालक संघाची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. हिंजवडी-शिवाजीनगर मार्गावरील मेट्रो चालवण्यासाठी संपूर्णपणे महिला चालकांचा समावेश असेल. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल गाठले जाणार आहे. तसेच, या निर्णयामुळे महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील आणि मेट्रो सेवेत त्यांचा सहभाग वाढेल.