पुणे : पुणे मेट्रोची विस्तारित सेवा या महिन्यात सुरू झाल्यापासून प्रवाशांचा प्रतिसाद वाढत आहे. विशेषत: पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांसाठी शनिवार, रविवारसह सुट्यांचे दिवस हे ‘मेट्रोवार’ ठरत आहेत. या दिवशी मेट्रोची प्रवासी संख्या उच्चांकी पातळीवर जात आहे. या महिनाभरात मेट्रोने १२ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, महामेट्रोला तिकिटांतून अडीच कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

मेट्रोची विस्तारित मार्गावरील सेवा १ ऑगस्टपासून सुरू झाली. मेट्रोने २७ ऑगस्टपर्यंत एकूण १२ लाख १८ हजार १२६ प्रवाशांनी प्रवास केला. त्यात वनाझ ते रुबी हॉल या मार्गावर ७ लाख ६ हजार ७५५ प्रवासी संख्या आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय मार्गावर ५ लाख ११ हजार ३७१ प्रवासीसंख्या आहे. स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला मेट्रोने १ लाख २३ हजारांची उच्चांकी प्रवासी संख्या नोंदविली. मेट्रोची विस्तारित सेवा सुरू झाल्यापासून रोजची सरासरी प्रवासी संख्या सुमारे ४० हजारांवर गेली आहे, अशी माहिती महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनावणे यांनी दिली.

आणखी वाचा-पुणे मेट्रो सुसाट, पण एसटी जागेवरच!

मेट्रोची विस्तारित सेवेमध्ये वनाझ ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला आहे. आधी या मार्गावर वनाझ ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याचवेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. विस्तारित मार्ग सुरू झाल्यापासून मेट्रोने प्रवास करण्याचा अनुभव घेण्यासाठी पुणेकर सुट्यांच्या दिवशी गर्दी करीत आहेत. त्यामुळे सुट्यांव्यतिरिक्त इतर दिवशी सरासरी प्रवासी संख्या ४० हजार आहे.

मेट्रोचे सर्वाधिक गर्दीचे दिवस

तारीख – प्रवासीसंख्या – उत्पन्न (रुपयांत)

५ ऑगस्ट (शनिवार) – ५७,७६९ – ९ लाख ५४ हजार

६ ऑगस्ट (रविवार) – ९६,५६९ – १६ लाख ४३ हजार

१२ ऑगस्ट (शनिवार) – ६२,०४४ – १० लाख ६५ हजार
१३ ऑगस्ट (रविवार) – ९२,३८९ – १७ लाख २० हजार

१५ ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन) – १,२३,७२० – ३० लाख ६३ हजार
१९ ऑगस्ट (शनिवार) – ५५,२९७ – ९ लाख २१ हजार

२० ऑगस्ट (रविवार) – ७६,८५२ – १३ लाख १६ हजार
२६ ऑगस्ट (शनिवार) – ५३,८३३ – ८ लाख ९६ हजार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२७ ऑगस्ट (रविवार) – ८०,६८२ – १३ लाख ७५ हजार