पुणे : पुण्यात मार्च महिन्यात १४ हजार ३०९ घरांची विक्री झाली. फेब्रुवारीच्या तुलनेत त्यात वाढ नोंदवण्यात आलेली नाही. मात्र, मुद्रांक शुल्क संकलनात २० टक्के वाढ झालेली आहे. मार्च महिन्यात एकूण ९ हजार २१५ कोटी रुपयांच्या मूल्याच्या घरांची नोंदणी झाली असून, त्यातून ६२१ कोटी रुपयांचा मुद्रांक शुल्क मिळाला आहे. घरांच्या किमती वाढल्याचा परिणाम विक्रीवर झालेला आहे.
पुण्यातील मालमत्ता विक्रीचा मार्च महिन्याचा अहवाल ‘नाइट फ्रँक इंडिया’ने जाहीर केला आहे. या अहवालानुसार, मार्च महिन्यात पुण्यात एकूण १४ हजार ३०९ घरांची विक्री झाली. यात ५० लाख रुपयांवरील घरांची विक्री ४६ टक्के आहे. फेब्रुवारीत हा आकडा ४२ टक्के होता. ग्राहकांकडून मोठ्या घरांना पसंती दिली जात असून, ८०० चौरस फूट अथवा त्यापेक्षा मोठ्या घरांच्या मागणीत २७ टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात ही वाढ २५ टक्के होती.
हेही वाचा – पुणे : रेल्वेचा आता पंचतारांकित विश्रांतीकक्षाचा घाट
मार्च महिन्यात २५ ते ५० लाख रुपयांदरम्यानच्या घरांना सर्वाधिक मागणी दिसून आली. एकूण विक्रीत या घरांचा वाटा ३८ टक्क्यांवर पोहोचला आहे. याचवेळी ५० लाख ते १ कोटी रुपयांदरम्यानचा घरांचा वाटा ३५ टक्के आहे. फेब्रुवारी महिन्यातही तो तेवढाच होता. मार्चमध्ये ५०० ते ८०० चौरस फुटांच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण एकूण विक्रीत ५० टक्के आहे. याचवेळी ५०० चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरांच्या विक्रीचे प्रमाण २३ टक्के आहे. याचबरोबर ८०० चौरस फुटांपेक्षा मोठ्या घरांच्यी विक्रीचे प्रमाण २७ टक्के आहे.
३०-४५ वयोगटातील सर्वाधिक ग्राहक
पुण्यात मार्चमध्ये घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये ५६ टक्के हे ३० ते ४५ वयोगटातील आहेत. याचवेळी ३० वर्षांखालील ग्राहकांची संख्या २१ टक्के आहे. त्याखालोखाल ४५ ते ६० वयोगटातील ग्राहकांची संख्या १७ टक्के असून, ६० वर्षांवरील ग्राहकांची संख्या केवळ ६ टक्के आहे.
हेही वाचा – पुणे : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने मिळवले ‘आयएसओ’ मानांकन
घरांच्या वाढत्या किमती आणि जादा व्याजदर असतानाही पुण्यातील निवासी मालमत्ता क्षेत्राने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. रिझर्व्ह बँकेने एप्रिलमधील पतधोरणात व्याजदरात वाढ न केल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात विक्रीत वाढ होईल, असे नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले.