पुणे : यंदाच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली असून अनेक मंडळ आणि घरगुती गणपती बाप्पासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचे ऐतिहासिक प्रसंग,पुरातन मंदिर ऑपरेशन सिंदूर, पर्यावरणाचा संदेश देणारे यासह अनेक देखावे साकारण्यात आले आहे.तर हे देखावे पाहण्यास नागरिकांनी एकच गर्दी केल्याच दिसून येत आहे.

तर त्याच दरम्यान पुणे शहरातील शनिवारवाड्या जवळील लाल महाल या ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती नारायण पेठ भागात राहणार्‍या संकेत बलकवडे या तरुणाने त्याच्या घरच्या गणपती बाप्पा समोर देखावा साकारला असून अगदी हुबेहुब लाल महाल साकारण्यात आला आहे.तर या देखाव्यामध्ये लाल महालाच्या खिडकीतून पळून जाणार्‍या शाइस्ते खानची छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे छाटली होती.तो प्रसंग दाखविण्यात आला आहे.

या देखाव्याबाबत संकेत बलकवडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले,मी प्रत्येक वर्षी गणेशोत्सवा दरम्यान विविध देखावे साकारले आहेत.तर मागील वर्षीच ठरवल होत की,यंदाच्या वर्षी लाल महाल देखावा सादर करायचा आणि तो आज साकारून खूप आनंद होत आहे.या देखाव्याला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागला.तर कोणताही ऐतिहासिक देखावा साकारताना तेथील वास्तू बाबत संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते.त्यानुसार मी लाल महाल येथे जाऊन सर्व गोष्टी पाहिल्या आणि प्रत्येक भागातील फोटो घेतले.

त्याचा अभ्यास केला आणि त्यानंतर लाल महाल देखावा साकारण्यास सुरुवात केली.एमडीएफ मटेरिअल आणि लाकडाचा वापर करून हा देखावा साकारण्यात आला.तर त्या वास्तूमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी शाइस्ते खानची बोटे छाटली होती.तो प्रसंग दाखविण्यात आला आहे.तर या देखाव्यामधून पुढील पिढीला इतिहास समजण्यास अधिक मदत होईल,आपण प्रत्येकाने अशा ऐतिहासिक वास्तूचे देखावे सादर केले पाहिजे,असे आवाहन देखील त्यांनी केले.