पुणे : शहरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. वारजे, वडगाव शेरी, हडपसरमघील मगरपट्टा, तसेच नऱ्हे परिसरात चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून सात लाखांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली.

वारजे-एनडीए रस्त्यावरील अमृतवेल सोसायटीत सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड, तसेच सोन्याचे दागिने असा एक लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदारांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी १६ जुलै रोजी मध्यरात्री कपाटातील तीन हजारांची रोकड आणि दागिने असा एक लाख ७३ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करत आहेत.

वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागातील एका वसतिगृहात शिरलेल्या चोरट्याने लॅपटाॅप आणि मोबाइल संच असा एक लाख ६८ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत एका तरुणाने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरीतील सोमनाथनगर भागात बालाजी पीजी हाॅस्टेल आहे. शुक्रवारी (१८ जुलै) मध्यरात्री चोरटा वसतिगृहात शिरला. वसतिगृहात राहणाऱ्या तरुणाचा लॅपटाॅप आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लांबवून चोरटा पसार झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून, सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. सहायक पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

हडपसर भागतील मगरपट्टा सिटी परिसरात एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. याबाबत एकाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार मगरपट्टा सिटीतील काॅसमाॅस सिटी साेसायटीत राहायला आहेत. बंद सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दागिने, मनगटी घड्याळ अशा तीन लाख ६२ हजार रुपयांचा ऐवज लांबविला. पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी तपास करत आहेत.

सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे भागात एका सोसायटीतील सदनिकेत शिरलेल्या चोरट्याने लॅपटाॅप, मोबाइल संच असा ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. याबाबत एका तरुणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नऱ्हे-धायरी रस्त्यावरील लँड मार्क सोसायटीत तक्रारदार राहायला आहे. सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संंधी साधून चोरटा आत शिरला. लॅपटाॅप, मोबाइल संच चोरुन चोरटा पसार झाला. पोलीस कर्मचारी प्रकाश पाटील तपास करत आहेत.

शहरात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दाखल होणाऱ्या गुन्ह्यांच्या तुलनेत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण कमी आहे. भरदिवसा सोसायटीत शिरुन चोरटे बंद सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज लांबवितात. शहरातील अनेक सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे, तसेच सुरक्षारक्षक नाहीत. चोरटे अशा सोसायटींची पाहणी करुन घरफोडीचे गुन्हे करतात.