पुणे : देशभरात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत घरांच्या विक्रीला ‘घरघर’ लागल्याचे चित्र दिसून येत आहे. देशातील सात महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत ९ टक्के घट झाली. विशेष म्हणजे मुंबई आणि पुण्यात ही घट सर्वाधिक असून, ती अनुक्रमे १६ व १३ टक्के आहे. वाढत्या किमतीमुळे घरांच्या मागणीवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.

‘अनारॉक ग्रुप’ने देशातील सात महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा तिमाही अहवाल जाहीर केला. त्यात दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरु, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकता यांचा समावेश आहे. या अहवालानुसार, तिसऱ्या तिमाहीत यंदा ९७ हजार ८० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत ही विक्री १ लाख ७ हजार होती. त्या तुलनेत यंदा विक्रीत ९ टक्के घसरण झाली आहे.

घरांच्या विक्रीत घट झाली असली, व्यवहार मूल्यात मात्र वाढ नोंदविण्यात आली आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत घरांचे १.३३ लाख कोटी रुपयांचे व्यवहार होते. यंदा तिसऱ्या तिमाहीत त्यात १४ टक्के वाढ होऊन हे व्यवहार १.५२ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहेत. मोठ्या आणि आलिशान घरांच्या विक्रीतील वाढ यासाठी कारणीभूत ठरली आहे. देशातील सात महानगरांतील एकूण घरांच्या विक्रीत मुंबई आणि पुण्याचा वाटा ४८ टक्के आहे.

किमतीत ९ टक्के वाढ

देशातील सातही महानगरांत मागील तीन वर्षांत घरांच्या किमतीत सातत्याने वाढ सुरू आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत घरांची सरासरी किंमत प्रतिचौरस फूट ८ हजार ३९० रुपये होती. यंदा तिसऱ्या तिमाहीत ही सरासरी किंमत ९ हजार १०५ रुपयांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात ९ टक्के वाढ नोंदविण्यात आली. दिल्लीत घरांच्या किमतीत सर्वाधिक २४ टक्के वाढ झाली आहे, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

महानगरांतील घरांची विक्री

विक्रीत घसरणीची कारणे

– घरांच्या किमतीत गेल्या तीन वर्षांत सातत्याने वाढ

– किमती जास्त असल्याने ग्राहकांचा हात आखडता

– विकासकांकडून मोठ्या, आलिशान घरांचा जास्त पुरवठा

– परवडणाऱ्या घरांचे पर्याय कमी प्रमाणात उपलब्ध

– आयटीतील कर्मचारी कपातीच्या वाऱ्यामुळे मागणीवर परिणाम यंदा तिसऱ्या तिमाहीत मुंबईत ३० हजार २६० घरांची विक्री झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १६ टक्के घसरण झाली आहे. याच वेळी पुण्यात तिसऱ्या तिमाहीत १६ हजार ६२० घरांची विक्री झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात १३ टक्के घसरण नोंदविण्यात आली आहे. हैदराबादमध्ये ११ हजार ३०५ आणि दिल्लीत १३ हजार ९२० घरांची विक्री झाली आहे. या दोन्ही महानगरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीतील घट प्रत्येकी ११ टक्के आहे. बंगळुरूमध्ये १४ हजार ८३५ घरांची विक्री झाली असून, त्यातील घट १ टक्का आहे. चेन्नई आणि कोलकत्यात घरांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत अनुक्रमे ३३ व ४ टक्के वाढ झाली आहे. चेन्नई आणि कोलकत्यातील घरांची विक्री अनुक्रमे ६ हजार १० व ४ हजार १३० आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.