लोणावळा : अनंत चतुर्दशीपासून आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे लोणावळा, खंडाळा परिसरात रविवारी पर्यटकांची गर्दी झाली आहे. मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून लोणावळ्यात दाखल झाल्याने मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कोंडी झाली. भुशी धरण, लायन्स पाॅईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. गणेशोत्सवानंतर सलग सुट्ट्या आल्याने शनिवारी सायंकाळनंतर लोणावळ्यात पुणे, मुंबईसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पर्यटक दाखल होण्यास सुरुवात झाली.

रविवारी (१ ऑक्टोबर) सकाळपासून खंडाळा येथील राजमाची गार्डन, खंडाळा तलाव, लायन्स पाॅईंट, भुशी धरण परिसरात पर्यटकांची गर्दी झाली होती. पहाटे लोणावळा, खंडाळा परिसरात जोरदार पाऊस झाल्याने धबधबे वाहू लागल्याने पर्यटकांचा आनंद द्विगुणीत झाला. दिवसभर ढगाळ वातावरण, तसेच दाट धुके पडले होते. तुंगार्ली धरण, बाळू मामा मंदिर परिसरात पर्यटक आले होते.

हेही वाचा : शरद पवार हे नास्तिक नाहीत – खासदार श्रीनिवास पाटील

मावळातील कार्ला लेणी, भाजे लेणी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, पवना धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली. सलग सुट्ट्या आल्याने लोणावळा शहर, तसेच परिसरातील हाॅटेलमधील खोल्या पर्यटकांना आरक्षित केल्या होत्या. खासगी फार्म हाऊस, पर्यटन महामंडळाचे निवास केंद्र आरक्षित करण्यात आले होते. मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने लोणावळा शहर परिसरात कोंडी झाली होती.

हेही वाचा : फुटीनंतर पडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट एकत्र येणार का? शरद पवार स्पष्टच म्हणाले, “जे लोक…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर आणि ग्रामीण भागातील कोंडी सोडविण्यासाठी लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सीताराम डुबल, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. द्रुतगती मार्गावरील वाहतूक संथ झाली होती