पिंपरी : ‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार ठामपण उभे असून, मदतीच्या ३१ हजार कोटी रुपयांपैकी पहिल्या टप्यात आठ हजार २०० कोटी रुपयांच्या रकमेचा शासन आदेश काढण्यात आला आहे,’ असे कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार या इमारतीचे उद्घाटन सोमवारी झाले. त्यावेळी भरणे बोलत होते. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, शंकर मांडेकर, माजी आमदार बाळा भेगडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यावेळी उपस्थित होते. भरणे म्हणाले, ‘राज्यातील शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारही मोठी मदत करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भरीव मदत केली जाईल. संकटाच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे.’
‘मला ‘राष्ट्रवादी’त येण्याचा प्रस्ताव’
मुरलीधर मोहोळ म्हणाले, ‘मावळ तालुका हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमी आहे. सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उमेदवारी मिळावी म्हणून शेळके यांचा प्रयत्न होता. परंतु, उमेदवारी मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कोथरुडमधून माझेही तिकीट कापल्याचे त्यांनी मला सांगितले. चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यावेळी शेळके यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याचा प्रस्ताव दिला होता. परंतु, मी प्रस्ताव नाकारला. भाजपमध्ये राहिलो. त्यामुळे माझे आणि शेळके यांचेही भले झाले’.
‘मामा-भाच्यांमध्ये कोणी पडू नये’
भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे आणि मी हातात हात घालून विकास करायचे ठरवले, तर मावळ तालुका सर्वात सुजलाम् सुफलाम् तालुका होईल. आमच्या मामा-भाच्यांमध्ये कोणी पडू नये. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढू, गावा-गावांमध्ये संघर्ष नको, राजकारण नको, युतीसाठी मी टाळी देण्यास हात पुढे करत असल्याचे सांगत आमदार शेळके यांनी भाजपकडे युतीसाठी प्रस्ताव दिला. त्यावर भाजप युतीसाठी तयार आहे. मावळ तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका बिनविरोध करुन नवीन इतिहास निर्माण करावा, असे आवाहन भेगडे यांनी केले.चौकटप्रकृतीच्या कारणामुळे अजित पवार गैरहजरउपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रकृती बरी नाही. रविवारी रात्री अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नसल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.