पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी बावधन आणि कोथरूड प्रभागाची मतदारयादी पडताळणी केल्यानंतर या प्रभागातील मतदारयादीत घोळ असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. या प्रभागातील १ हजार १५८ मतदारांची नावे दुबार, तिबार नोंदवण्यात आली असून, यादीमध्ये कन्नड आणि गुजराती भाषेतील नावांचाही समावेश असल्याचा दावा करण्यात आला. सनदी अधिकाऱ्यांची नावेही दोन ठिकाणी नोंदविण्यात आल्याचे ‘मनसे’ने म्हटले आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून मतदारयादी पडताळणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार बावधन-कोथरूड प्रभागातील मतदारयादीची पडताळणी करण्यात आली. मनसे सरचिटणीस बाळा शेडगे यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतली. मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष नरेंद्र तांबोळी, कोथरूड विभाग सचिव राजेंद्र वेडे-पाटील, शहर संघटक प्रशांत मते, शहर सचिव संजय भोसले, उपविभाग अध्यक्ष महेश लाड आणि शहर सचिव रमेश जाधव यावेळी उपस्थित होते.

शेडगे म्हणाले, ‘हा प्रभाग खडकवासला, कोथरूड आणि भोर-मुळशी विधानसभा मतदारसंघात येतो. प्रभागातील एक हजार १५८ मतदारांची नावे मतदारयादीत दोन-तीन आणि चार वेळा नोंदवण्यात आली आहेत. दुबार नावांमध्ये काही ठिकाणचे पत्तेही तेच आहेत. तसेच, काही मतदारांची नावे कन्नड आणि गुजराती भाषेत असल्यामुळे मतदार ओळखता येत नाहीत.’

ते म्हणाले, ‘मतदारयादीत काही नावे सारखी असू शकतात. मात्र, या दुबार मतदारांची छायाचित्रेही तीच आहेत. एकच नाव वगेवेगळ्या पद्धतीने नोंदवण्यात आले आहे. मतदार तेच आहेत. फक्त त्यांचे पत्ते बदलेले आहेत. पडताळणी करताना खडकवासला, भोर आणि कोथरूड विधानसभा मतदारसंघाच्या यादीत अशी अनेक नावे आढळून आली. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.’

‘महाऊर्जा’च्या महासंचालकांचे नाव दोन वेळा’

पुणे महापालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त आणि ‘महाऊर्जा’चे महासंचालक ओम प्रकाश बकोरिया यांचे नाव भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयादीत नोंदवण्यात आले असल्याचा दावा मनसेचे बाळा शेगडे यांनी केला. ‘मतदार यादीत सनदी अधिकाऱ्यांची नावे दुबार नोंदवण्यात येतात. त्यामुळे नागरिकांनी मतदार यादीवर विश्वास ठेवायचा का ?’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.