देहू : देहू संस्थानच्या विश्वस्तांनी देहूच्या हक्काच्या गायरानासाठी बेमुदत उपोषणाची हाक दिली आहे. देहूच्या दीडशे एकर गायराना पैकी ५० एकर गायरान हे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या मुख्यालयाला देण्याच्या हालचाली सरकारकडून सुरु आहेत. याला देहूकरांचा विरोध असून हे गायरान देहूकरांच्या हक्काचं आहे, गायरानाला वारकरी भवनासह इतर वास्तू उभारण्यासाठी आणि दिंडी विसाव्यासाठी आरक्षित करावं, अशी मागणी देहूच्या विश्वस्तांनी केली आहे. जोपर्यंत सरकार आमच्या बेमुदत उपोषणाची दखल घेत नाहीत, तोपर्यंत आम्ही उपोषण करण्यावर ठाम असल्याची भूमिका देहू संस्थानच्या विश्वस्तांनी मांडली आहे. ‘गायरान वाचवा…गाव वाचवा’ असे म्हणत त्यांनी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रवेश द्वारासमोरच बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड मधील प्रदूषण घटले, धुलिकणांचे प्रमाण किती?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे म्हणाले, वर्षातून पाच मोठ्या यात्रा देहूत होतात. आषाढी वारीच्या पालखी प्रस्थानावेळी लाखो भाविक देहूत दाखल होतात, चारशे दिंड्या असतात. आमची २००१ पासून मागणी आहे, की गायरान आम्हाला द्या. तेव्हा ५० एकर जागेची मागणी आहे. आता शंभर एकर जागा द्यावी ही मागणी आहे. वारकरी भवन, निवासस्थान, अतिथी भवन, संत विद्यापीठ, गोशाळा आणि पालखी तळासाठी गायरानची जागा हवी आहे. या मागणीची शासनाने ताबडतोब दखल घ्यावी. आमचं हे आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू राहील. लवकरात लवकर प्रशासनाने हा प्रश्न मार्गी लावावा. गायरानची जागा देहूकरांनाच द्यावी. अशी मागणी देहू संस्थानकडून करण्यात आली आहे.