Pune Maval Bridge Collapse Updates : पुण्यातील मावळमध्ये इंद्रायणी नदीवर कुंडमळ्यात पूल कोसळल्याने काही पर्यटक बुडाल्याची माहिती मिळत आहे. ही घटना साडेतीनच्या सुमारास घडल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत. आतापर्यंत या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. वाहून गेलेल्या पर्यटकांचा रात्री उशीरापर्यंत एनडीआरएफच्या पथकाकडून शोध घेतला जात होता.

कुंडमळा ओलांडण्यासाठी इंद्रायणी नदीवर हा पूल आहे. मोठ्या संख्येने पर्यटक या परिसरात आले असतांना, पूलावरुन पर्यटकांची ये-जा सुरु असतांना हा पूल कोसळला आहे.

मावळमधील कुंडमळा हे पर्यटन स्थळांपैकी एक आहे. विशेषत: पावसाळ्यात दुथडी भरून वहाणारी इंद्रायणी नदी, हिरवागार परिसर यामुळे इथे पर्यटकांची गर्दी असते. त्यातच आज रविवार, सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक या भागात आले होते. पर्यटकांची संख्या पूलावर जास्त झाल्याने हा पूल कोसळल्याच बोललं जात आहे.

अद्याप कुंडमळ्यात किती पर्यटक बुडाले आहेत याबाबत अद्याप आकडा स्पष्ट होऊ शकला नाही. प्राथमिक अंदाजानुसार २० ते २५ जण बुडाल्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, मावळ वन्यजीव रक्षक यांची टीम पोहचली आहे. बचावकार्य सुरू आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान आत्तापर्यंत या नदीपात्रात अडकलेल्या ३८ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात पोलीस प्रशासन, अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या टीमला यश आलं आहे. चार जण या दुर्घटनेत ठार झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.