पिंपरी : दोन वेळा नोटीस देऊनही अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसल्याने वीज, पाणीपुरवठा बंद करून चिखली, कुदळवाडी, तळवडे भागातील २६ व्यावसायिक मालमत्ता लाखबंद (सील) करण्यात आल्या आहेत. अग्निप्रतिबंधक यंत्रणा नसलेल्या मालमत्तांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये औद्योगिक व व्यावसायिक मालमत्तांना आग लागल्याने जीवित व वित्तहानीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मालमत्तांमध्ये अग्निप्रतिबंधात्मक उपाययोजना नसल्यामुळे या घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच व्यवसायाच्या ठिकाणीच वास्तव्य, धोकादायक पदार्थांचा साठा केल्याचे दिसून आले आहे. भविष्यात दुर्घटना होऊ नये याकरिता शहरातील औद्योगिक, व्यावसायिक मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण महापालिकेच्या अग्निशामक विभागाने केले.
हेही वाचा : पिंपरी- चिंचवड: गणपती मंडळांनी बळजबरी वर्गणी मागितल्यास होणार कडक कारवाई; पोलीस आयुक्त चौबे यांचा इशारा
सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांपैकी धोकादायक मालमत्ताधारकांना अग्निशामक यंत्रणांची उपलब्धता, ये-जा करण्याचा सुरक्षित मार्ग, धोकादायक पदार्थांचा साठा, निवासी वास्तव्याचा विचार करता अग्निशामक यंत्रणा बसविण्याची पहिली नोटीस दिली. त्यानंतर काही मालमत्ताधारकांनी अग्निशामक यंत्रणा बसविली. कोणतीही कार्यवाही न केलेल्या मालमत्ताधारकांना दुसरी नोटीस देण्यात आली आहे. दोन वेळा नोटिसा बजाविण्यात आल्यानंतरही काही मालमत्ताधारकांनी अग्निसुरक्षितेबाबत उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे मालमत्तांचा पाणी व वीजपुरवठा बंद करून चिखली, कुदळवाडी, तळवडे भागातील २६ मालमत्ता लाखबंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा : आईच्या प्रियकराकडून १४ वर्षीय मुलीशी अश्लील चाळे
इमारतीमध्ये आवश्यक असणाऱ्या आग प्रतिबंधक उपाययोजना करणे, त्या कार्यान्वित ठेवणे, परवानाधारक संस्थेकडून प्रमाणपत्र अग्निशामक कार्यालयाला सादर करणे बंधनकारक आहे. याची जबाबदारी इमारत मालक किंवा भोगवटादाराची आहे. व्यावसायिकांकडून उपाययोजना होत नसल्याने मालमत्ता लाखबंद करण्यात येत असल्याचे अग्निशामक विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.