पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कटाचा अतिरिक्त तपास ककरण्यासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी २६ जुलै २०२३ रोजी तळेगाव दाभाडे परिसरात एक कारवाई केली होती. यामध्ये तपासाअंती सात सराईत गुन्हेगारांना अटक केली. ज्यांच्याकडून नऊ पिस्तूल, ४२ काडतुसे, कोयते जप्त करण्यात आले. आरोपी पुणे, जालना, मध्य प्रदेश येथील गुन्हेगार आहेत. या आरोपींवर खून, खंडणी, वाहनांची तोडफोड, जाळपोळ, बेकायदेशीर हत्यार बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

या पार्श्वभूमीवर आमदार सुनील शेळके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये लक्षवेधी उपस्थित करत चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी केली होती. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी याबाबीची विशेष तपास पथकामार्फत चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर तपास पथकाची स्थापन करण्यात आली आहे.

तळेगाव दाभाडेत यापूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने अतिरिक्त तपास, तसेच अन्य कुणाचा प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष सहभाग आहे का, याचा सखोल तपास केला जाईल, असे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी सांगितले.