पिंपरी : उच्चदाब विद्युत वाहक तारांच्या एका मनोऱ्याच्या (टॉवर) अडथळ्यामुळे रखडलेल्या बोपखेल आणि खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाचे काम सुरू झाले आहे. खासगी जागा ताब्यात आल्याने मनोरा स्थलांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला. दोन महिन्यांत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाने (सीएमई) १३ मे २०१५ रोजी बोपखेल ते दापोडी हा नागरी रस्ता बंद केला. नागरिकांना दिघी, विश्रांतवाडीमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात ये-जा करावी लागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बोपखेल ते खडकी असा मुळा नदीवर दोन किलोमीटर अंतराचा पूल बांधण्यात येत आहे. न्यायालयीन प्रक्रिया, संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात येण्यास विलंबामुळे पुलाचे काम रखडले होते. पूल ५१२ आर्मी बेस वर्कशॉप, ॲम्युनिशन फॅक्टरी तसेच संरक्षण विभागाच्या इतर आस्थापनांच्या जवळून जात असल्याने सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस पाच मीटर उंचीची सीमा भिंत उभारली आहे. त्यावर १.५ मीटर उंचीचे सुरक्षा कठडे बसविण्यात आले आहेत.

हेही वाचा…पिंपरी : लोकसभा निवडणुकीची तयारी; पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांची पाहणी

पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले होते. उर्वरित काम उच्चदाब वाहक विद्युत तारांचा मनोऱ्याचे स्थलांतर केल्यानंतरच करता येणार होते. त्यासाठी बोपखेलच्या बाजूने एक मनोरा उभारणे आवश्यक आहे. खडकीकडील जागा ताब्यात आली असून तेथे पाच मनोरे उभारून तारांची जोडणी करण्यात आली मात्र, बोपखेल येथील खासगी जागा ताब्यात येत नसल्याने ते काम रखडले होते. प्रशासन आणि जागा मालक यांच्यात तोडगा निघत नव्हता. माजी उपमहापौर हिराबाई घुले यांनी महापालिका प्रशासन आणि जागा मालकांमध्ये समन्वय घडवून आणला. एकत्र बैठक झाली. जागेचा मोबदला भविष्यात हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) स्वरूपात देण्याचे आश्वासन जागा मालकांना दिले. त्यानंतर जागा मालकांनी काम सुरू करण्यास परवानगी दिली.

हेही वाचा…पुणे: अमित ठाकरे यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

माजी उपमहापौर हिराबाई घुले म्हणाल्या की, प्रशासनाने लवकरात-लवकर काम पूर्ण करावे. पूल खुला झाल्यानंतर बोपखेलवासीयांना नऊ वर्षांपासून मारावा लागत असलेला १५ किलोमीटरचा वळसा थांबेल. कार्यकारी अभियंता महेश कावळे म्हणाले की, पुलाचे काम सुरू झाले आहे. दोन महिन्यांत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.