पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत मी बोलत असलो तरी सुनेत्रा पवार यांच्याबाबत बोलणार नाही. कारण त्या राजकारणात नव्हत्या. समाजकारणात काम करत होत्या. बारामती लोकसभा मतदारसंघातील लढत खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार अशीच होणार आहे. अजित पवार यांची भूमिका लोकांना आवडली नाही. अजित पवार यांनी उमेदवार ठरविला आहे. पण, अद्याप जाहीर केला नाही, असे रोहित पवार म्हणाले.
मराठा आरक्षणावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने मराठा समाजाला १६ टक्के, भाजपच्या काळात १३ टक्के तर आता १० टक्के आरक्षण दिले. मराठा समाजाची २८ टक्के लोकसंख्या असताना १० टक्के आरक्षण का दिले, गायकवाड आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने काढलेल्या त्रुटींवर सरकारने अभ्यास केला नाही.
हेही वाचा…अजितदादांचा सख्खा पुतण्या शरद पवारांसोबत, रोहित पवार म्हणाले…
राज्य मागासवर्ग आयोगाने घाईगडबडीत १५ दिवसांत सर्व्हे केला आहे. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हा निर्णय घेतला की काय अशी भीती वाटते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण टिकविण्यासाठी प्रयत्न करु सांगितले. प्रयत्न हा शब्द राज्यकर्त्यांना मतदान मिळवून देईल पण सामान्य लोकांसाठी घातक ठरु शकतो. आम्हाला आरक्षणावर सभागृहात बोलायचे होते. पण, बोलू दिले नाही, असेही ते म्हणाले.