पुणे : दिवाळीत शहराच्या वेगवेगळ्या भागांत ६८ ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. बहुतांश ठिकाणी आतषबाजीमुळे आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली.

दिवाळीत (नरक चतुर्दशी ते भाऊबीज) शहरातील वेगवेगळ्या भागांत आग लागण्याच्या घटना घडल्या. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळनंतर आग लागण्याच्या सर्वाधिक घटना घडल्या. बहुतांश ठिकाणी लागलेल्या आगी किरकोळ स्वरूपाच्या होत्या. गवत, झुडपे, कचरा, सोसायटीच्या आवारातील कचरा, मोकळ्या जागेत फटाके वाजवल्याने आग लागण्याच्या घटना घडल्या. काही ठिकाणी गॅलरीतील पडदे, वाहनांवरील प्लास्टिकचे आच्छादन, सोसायटीच्या आवारात अडगळीत पडलेल्या कचऱ्याने पेट घेतला. फटाक्यांमुळे फुरसुंगी, खराडी, कोरेगाव पार्क, भवानी पेठ, नाना पेठ, टिंगरेनगर, बाणेर, मार्केटयार्ड, कात्रज, धानोरी, येरवडा, हडपसरसह वेगवेगळ्या भागांत आग लागली.

हडपसरमधील फुरसुंगी भागात एका उंच इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील गॅलरीत पेटता बाण पडल्याने पडदा पेटला आणि सदनिकेत आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन काही मिनिटांतच आग आटोक्यात आणली.

खराडीतील गेरा सोसायटी परिसरात पेटत्या फटक्यामुळे कचऱ्याने पेट घेतला. हडपसर लोहमार्गाजवळ गवताला आग लागली. अग्निशमन दलाने त्वरित घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दिवाळीत चार दिवसांत शहराच्या वेगवेगळ्या भागांत आग लागण्याच्या ६८ घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, तसेच जवानांनी त्वरित मदतकार्य केल्याने आग नियंत्रणात आली.

दिवाळीतील आगीच्या घटना

  • २१ ऑक्टोबर ४२
  • २२ ऑक्टोबर २३
  • २३ ऑक्टोबर ३