पुणे : विवाहाच्या आमिषाने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात आसाममधील तरुणीची पाच लाख रुपयात विक्री करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी चौघांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, एका अनाेळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका २५ वर्षीय तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, शफीऊल आबुल नसूर वाहीद आलम (रा. आसाम), पापा शेख, अधुरा शिवा कामली (दोघे रा. बुधवार पेठ), तसेच एका अनोळखी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शफीऊल मूळचा आसाममधील आहे. त्याने जानेवारी महिन्यात विवाहाचे आमिष दाखवून पीडित तरुणीला आसाममधून पळवून आणले. त्याने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाख रुपयात तरुणीची विक्री केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तरुणीला धमकावून दलाल पापा शेख, अधुरा कामली यांनी तिला वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले. आरोपींच्या ओळखीतील एका पोलीस कर्मचाऱ्याने तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार केले. गेले चार महिने हा प्रकार सुरू होता. पीडित तरुणीने त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली आणि पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये (पीटा) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अजित जाधव तपास करत आहेत.