पुणे : युवा पदाधिकारी असताना १९९९ ते २००४ या कालखंडात राज्य पिंजून काढले. त्याचा परिणाम २००४ च्या निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात जास्त जागा जिंकणारा पक्ष ठरला. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्री पद मिळाले नाही. मुख्यमंत्री पद का मिळाले नाही, याच्या जास्त खोलात मी आत्ता जाणार नाही. मात्र आताही जरा दमाने घ्या. सारखे मुख्यमंत्री, मुख्यमंत्री करू नका, प्रथम पक्ष संघटना मजबूत करा मग मुख्यमंत्री पदाचे पाहू, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना रविवारी सुनावले.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित युवा मिशन या मेळाव्यात अजित पवार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. भाजपबरोबर सत्तेत असलो तरी विचारधारा कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडून आलेल्या सर्व आमदारांची बरोबर जाण्याची भूमिका होती. मात्र वरिष्ठांनी ही भावना समजून घेतली नाही, पण ती समजून घेतल्याचे भासविले. पक्षाची फरफट होऊ नये म्हणूनच ठोस भूमिका स्वीकारावी लागली. गेल्या दहा वर्षात त्यांच्याकडून दूरध्वनी केले जात नव्हते. चौकशी केली जात नव्हती. आता मात्र चौकशी सुरू आहे. त्यामुळे दूरध्वनी आले तरी हळवे होऊ नका, मनाची चलबिचल होऊ देऊ नका. महायुती देईल त्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन पवार यांनी यावेळी केले.

हेही वाचा…छगन भुजबळ म्हणाले, ‘अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी…’

अजित पवार म्हणाले की, युवा वर्ग सामाजिक आणि राजकीय बदलांचे आधार असतात. जगात जिथे क्रांती झाली ती युवकांच्या बळावर झाली आहे. त्यामुळे नव्या बदलाच्या युगाचा स्वीकार करावा लागणार आहे. आताच्या काळातील राजकारण वेगळे झाले आहे. समाजमाध्यमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या माध्यमाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. पक्ष, पक्षाचे नेते, कार्यकर्ते पदाधिकारी बदनाम होतील, अशी कोणतीही कृती करणे चुकीचे आहे. बदनामी होत असेल तर निरोपाची वाट न पहाता त्याचे खंडन करणे अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने विचारधारा सोडलेली नाही. शिवसेनेबरोबर असतानाही ती कायम होती. भाजबरोबर असतानाही कायम आहे. महाविकास आघाडी आणि त्यानंतर महायुती का केली हे यापूर्वच सांगितले आहे.

हेही वाचा…देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम पुण्यात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आमदारांना मंत्रीपद मिळाले मात्र आम्हाला काय असे कार्यकर्त्यांना वाटत असेल . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात न्यायालयात याचिका दाखल आहे. मात्र येत्या दोन महिन्यात लोकसभेची निवडणूक होईल. त्याची आचारसंहिता महिन्याभरात लागेल. त्यामुळे प्रथम महायुतीच्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करावे लागेल. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रयत्नात कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक पक्ष प्रवेश होत आहेत. त्यांचे स्वागत करताना आपला मूळचा कार्यकर्ता डावलला जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. निवडणुकीत सर्वांना एकत्रित काम करावे लागणार आहे. त्यासाठी राजकीय भूमिका स्वीकारावी लागेल. सत्तेत सहभागी झालो असलो तरी विचारधारा कायम आहे. मात्र त्याबाबत जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात आहे. त्यामुळे चलबिचल होऊन नका, चुकीचे निर्णय घेऊ नका. नव्या विचाराने पुढे जा, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.