पुणे : पादचारी महिलेचे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना बालेवाडी भागात घडली. याबाबत एका महिलेने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला बालेवाडी भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. त्या शुक्रवारी (११ जुलै) त्या सकाळी अकराच्या सुमारास पर्ल सोसायटीच्या परिसरातून निघाल्या होत्या. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले.
महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात दुचाकीवरुन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक डाबेराव तपास करत आहेत.शहरात पादचारी महिलांकडील दागिने हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, तसेच पादचाऱ्यांकडील मोबाइल संच हिसकावून नेण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.
बक्षीसाच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची फसवणूक
बक्षीस देण्याच्या आमिषाने पादचारी ज्येष्ठ महिलेकडील ७५ हजारांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना खडकी परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला खडकी बाजार परिसरात राहायला आहेत. त्या १० जुलै रोजी दुपारी बाराच्या सुमारास खडकी बाजारातील कर्नल भगत शाळेजवळून निघाल्या होत्या. त्या वेळी चोरट्यांनी त्यांना अडविले.
ज्येष्ठ महिलांना बक्षीस वाटप करण्यात येत आहे. दागिने पिशवीत काढून ठेवा. दागिने दिसल्यास कार्यक्रमात बक्षीस मिळणार नाही, अशी बतावणी चोरट्यांनी त्यांच्याकडे केली. त्यानंतर चोरट्यंनी महिलेला बोलण्यात गुंतविले. महिलेकडील ७५ हजारांचे मंगळसूत्र पिशवी ठेवण्याचा बहाणा करनु चोरटे पसार झाले. पोलीस उपनिरीक्षक शरद देठे तपास करत आहेत.
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेचे दागिने लंपास
पीएमपी प्रवासी ज्येष्ठ महिलेची ६० हजारांची सोन्याची बांगडी लांबविण्यात आल्याची घटना गोळीबार मैदान परिसरात घडली. याप्रकरणी दोन महिलांसह साथीदारांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला सिंहगड रस्ता भागात राहायला आहेत. त्या हडपसर ते डीएसके विश्व या मार्गावरील पीएमपी बसमधून २५ जून रोजी सायंकाळी प्रवास करत होत्या. बसमध्ये गर्दी होती. त्यांच्याजवळ घोळक्याने थांबलेल्या चोरट्यांनी कटरचा वापर करुन बांगडी लांबविली. पोलीस उपनिरीक्षक सारिका शिर्के तपास करत आहेत.