पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपचा उमेदवार कोण, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक आणि भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनीही निवडणुकीसाठी ‘वाॅर रूम’ उभारल्याने प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ आणि माजी आमदार जगदीश मुळीक यांची ‘राजकीय’ अडचण झाल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणूक येत्या मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यातच खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेची पोटनिवडणूक घ्यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. पोटनिवडणूक होणार की नाही, याबाबत अद्यापही संभ्रमावस्था आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशामुळे पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली असून उमेदवार कोण असेल, याबाबत तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली आहे.

पुणे लोकसभेसाठी माजी महापौर व प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी शहराध्यक्ष व माजी आमदार जगदीश मुळीक यांची नावे पहिल्यापासून चर्चेत आहेत. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या कोणीही उमेदवारीचा अधिकृत दावा केला नसला, तरी मुळीक आणि मोहोळ यांच्याकडून तयारी सुरू झाली होती. मात्र पुण्यातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक देवधर यांचे नाव चर्चेत आले. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शहरात लक्ष द्यावे, अशी सूचना केल्याची चर्चा भाजप वर्तुळात आहे.

हेही वाचा : ‘या’ तारखेपर्यंत पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यास ३० हजार पुणेकर मतदानाला मुकणार…जाणून घ्या कारण

देवधर यांनीही निवडणुकीची तयारीही सुरू केल्याची वस्तुस्थिती आहे. विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती, पक्षाच्या प्रमुख नेत्या-पदाधिकाऱ्यांच्या भेटी त्यांच्याकडून सुरू झाल्या असून, विविध घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. समाजमाध्यमातही ते सक्रिय झाले असून, सार्वजनिक कार्यक्रमांमधील त्यांची उपस्थितीही वाढली आहे. ‘पुणेकर’ असल्याच्या मुद्द्यावर सध्या देवधर यांचा भर आहे. भाजप मित्रपक्षांतील नेत्यांबरोबरही त्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत.

हेही वाचा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुण्यातील विश्वविक्रमाचे कौतुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहोळ आणि मुळीक यांची नावे पहिल्यापासूनच चर्चेत होती. या दोघांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली होती. या दोघांनी उमेदवारीचा अधिकृत दावा केला नसला, तरी वाढदिवस, विविध उपक्रम राबवून तसेच नव्या संसदभवनाचे चित्र असलेले फलक लावून त्यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. हे दोघेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत. मात्र, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांबरोबरची देवधर यांची ‘जवळीक’ या दोघांसाठी राजकीय अडचणीची ठरत आहे. उमेदवारीसाठी या दोघांचे प्रयत्न सुरू असले, तरी देवधर यांच्या प्रचारामुळे त्यांची घुसमट झाल्याचे बोलते जात आहे. त्यामुळे दोघांनही सध्या सावध पवित्रा घेतला आहे. पोटनिवडणूक होणार का, झाली तर ती बिनविरोध होणार की नाही, अल्पकाळासाठी उमेदवार कोण असेल, याचे चित्र येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असले, तरी देवधर यांच्या निवडणूक तयारीने मोहोळ आणि मुळीक यांची राजकीय अडचण झाल्याची सध्याची परिस्थिती आहे.