पुणे : ‘टाळ-मृदूंगाच्या नादात, विठू नामाच्या गजरात पंढरीच्या दिशेने ज्ञानोबा-तुकोबाची पालखी खांद्यावर घेऊन निघालेल्या वारकऱ्यांची सेवा म्हणजे साक्षात पांडुरंगाचा आशीर्वाद असतो,’ अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी व्यक्त केली.
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि शीला राज साळवे ट्रस्ट यांच्या वतीने वारकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘फिरता दवाखाना’ या उपक्रमाचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. ‘काँग्रेस’चे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, ‘रिपब्लिकन पक्षा’चे राजेंद्र गवई, महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, माजी नगरसेवक ॲड. अविनाश साळवे, ‘सिंबायोसिस सोसायटी’चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, विश्वस्त संजीवनी मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. रमण या वेळी उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले,‘दरवर्षी लाखोंच्या संख्येने पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जात असतात. त्यात भक्ती आणि शिस्त असते. आषाढी वारीसाठी निघालेल्या या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे भाग्य असते. वारकर्यांच्या सेवेत विठ्ठल-रुक्मिणीचा आशिर्वाद असतो. त्यामुळे अनेक लहान- मोठ्या संस्था, संघटना आणि व्यक्ती आपापल्यापरीने वारकऱ्यांची सेवा करतो.’
‘वारकऱ्यांचा शीण उतरण्याचे काम करणारा हा ‘फिरता दवाखाना’ पर्यंत वारी असेल तोपर्यंत अविरतपणे चालू राहील,’ असा विश्वास डॉ. मुजुमदार यांनी व्यक्त केला.
वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय उपचार
पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना पुण्यापासून जेजुरीपर्यंत औषधोपचार, प्रथमोपचार आणि सर्व प्रकारच्या मोफत वैद्यकीय सुविधा तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, असे ॲड. अविनाश साळवे यांनी सांगितले.